Join us

शिवसेनेचे आव्हान, भाजपाची खेळी

By admin | Published: October 22, 2016 3:16 AM

महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजपा स्वतंत्र लढण्याचे स्पष्ट संकेत गुरुवारी मिळाल्यामुळे उभय पक्षांमध्ये आता विस्तवही जात नसल्याचे दिसू लागले

मुंबई : महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजपा स्वतंत्र लढण्याचे स्पष्ट संकेत गुरुवारी मिळाल्यामुळे उभय पक्षांमध्ये आता विस्तवही जात नसल्याचे दिसू लागले आहे. भाजपाने केलेल्या आरोपामुळे घायाळ शिवसेनेने आयुक्तांना पालिकेत माफियाराज आहे का? हे जाहीर करण्याचे आव्हान दिले आहे. ही संधी साधून भाजपानेही आज आयुक्तांना पत्राद्वारे रस्ते दुरुस्ती व बांधणीच्या काळातील भ्रष्टाचार जाहीर करण्याची मागणी करीत शिवसेनेला हिणवले आहे. तर शिवसेनेनेही मित्रपक्षाची पोलखोल करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे युतीमधील वाद रंगतच चालला आहे. महापालिकेत माफियाराज आणि दलाल असल्याचे आरोप भाजपाने केल्यानंतर शिवसेनेने तत्काळ बैठक घेऊन आयुक्तांना माफिया कोण, हे जाहीर करण्यास सांगितले. मात्र शिवसेना बिथरल्यामुळे भाजपाला अधिकच बळ मिळाले आहे. त्यामुळे नागरी कामांमधील माफियांचे प्रकार पत्राद्वारे जाहीर करीत आयुक्तांना चौकशी अहवाल उघड करण्याचे आव्हान भाजपाने आज दिले आहे. काळ्या यादीत टाकलेल्या ठेकेदारांना नागपूरमध्ये कंत्राट मिळते? याकडे बोट दाखवून शिवसेनेने भाजपाच्या भूमिकेविषयी संशय निर्माण केला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियाद्वारे भाजपाला प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईमध्ये माफिया तर नागपूरमध्ये ‘माफकिया’....असे टिष्ट्वट करून महापालिकेने काळ्या यादीत टाकलेल्या ठेकेदारांना नागपूरमध्ये कंत्राट मिळते, असा टोला भाजपाला लगावला. तर महापौर स्नेहल आंबेकर यांनी मािफयाराज असायला कोण यांच्या मागे तलवारी घेऊन लागले आहे, ते तरी सांगा, असा टोला लगावला आहे. (प्रतिनिधी)भाजपाने जाहीर केलेले माफियांचे प्रकार पाणी माफिया, टँकर माफिया, भंगार माफिया, रस्ते, डम्पिंग ग्राउंड, नालेसफाई, टॅब माफिया, खड्डे, जकात माफिया महापालिकेत असल्याचा आरोप भाजपाने आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात केला आहे.