पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची कटकारस्थाने - आशिष शेलार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:06 AM2021-06-02T04:06:11+5:302021-06-02T04:06:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पराभवाच्या भीतीने शिवसेनेकडून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी कटकारस्थाने सुरू आहेत. मुदतपूर्व निवडणुकीचा डाव फसल्यानंतर आता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पराभवाच्या भीतीने शिवसेनेकडून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी कटकारस्थाने सुरू आहेत. मुदतपूर्व निवडणुकीचा डाव फसल्यानंतर आता निवडणुका दोन वर्षे पुढे ढकलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप भाजप नेते, आमदार आशिष शेलार यांनी केला. मात्र, या सर्व हालचालींवर आमचे बारीक लक्ष्य असून शिवसेनेचा हा डाव आम्ही हाणून पाडू, असा इशाराही शेलार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.
भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत शेलार म्हणाले, मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या चर्चा सुरू झाल्यापासून शिवसेनेची खलबतं आणि कटकारस्थानं सुरू आहेत. पराभवाच्या भीतीने पळवाटा शोधण्याचे काम शिवसेना करते आहे. दीड वर्षापूर्वी कोरोनाची पहिली लाट आटोक्यात आल्यासारखे वाटले तेंव्हा मुदतपूर्व निवडणूक घेण्याचा विचार झाला होता. पण, दुर्दैवाने कोरोनाची दुसरी लाट आल्याने डाव फसला. त्यानंतर २०१७ मध्ये झालेली प्रभाग रचना असंवैधानिक असल्याची चर्चा सुरू करण्यात आली. त्यासाठी निवृत्त अधिकाऱ्यांना मोठ्या पगारावर कामाला लावण्यात आले. पण, ती वॉर्ड रचना २०२१ च्या जनगणनेच्या आधारावरच असल्याचे लक्षात आल्याने हा प्रयत्न फेल ठरल्याने आता तिसरा डाव टाकला जात आहे. तिसऱ्या लाटेची भीती दाखवत जनगणना करता येत नाही. नवी मतदार नोंदणी करताना अधिक वेळ लागेल. त्यामुळे महापालिकेला दोन वर्षे मुदतवाढ देण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरू असल्याचे शेलार म्हणाले. तसेच शिवसेनेचा हा डाव काँग्रेस, राष्ट्रवादीला मान्य आहे का? हे त्यांनी स्पष्ट करावे, असेही ते म्हणाले.
बंदूक भी तेरी, गोली भी तेरी...
मुंबईतील ३० वॉर्ड असे आहेत जे शिवसेना आणि काँग्रेसला आजन्म जिंकता येणार नाहीत. त्यामुळे या वॉर्डांमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. निवडणुकीच्या रणांगणात शिवसेनेला आम्ही एकच आठवण करून देतो, ‘बंदूक भी तेरी, गोली भी तेरी, दिन-तारीख भी तेरी, सुबह कहे सुबह, शाम कहे शाम, शिवसेना को परास्त करने भाजप तयार है!’ अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेला आव्हान दिले.
नालेसफाईतही कट कमिशन
७० कोटी खर्चून केलेली नालेसफाई संपूर्ण आभासी आहे. पाच लाख मेट्रिक टन गाळ काढला म्हणता, मिठी नदीचा जरी गाळ पकडला तरी तो टाकला कुठे? ते सरकारी डम्पिंग ग्राउंड असेल तर गाळ टाकल्याचा फोटो दाखवा, खासगी असेल तर सीसीटीव्ही दाखवा, गाळ कुठे मोजला त्या वजन-काट्याच्या पावत्या दाखवा, असे आव्हान देतानाच नालेसफाईतसुद्धा कट कमिशन सुरू असल्याचा दावाही शेलारांनी केला.