Join us  

धाकधुक वाढली! उद्याच्या सुनावणीकडे महाराष्ट्रासह देशाचं लक्ष; संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 5:11 PM

उद्या म्हणजेच ११ जूलै रोजी शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांच्या निलंबणाच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

मुंबई- उद्या म्हणजेच ११ जूलै रोजी शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांच्या निलंबणाच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्याचा दिवस शिवसेनेसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाकडे महाराष्ट्रासह अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने उद्या सुनावणीत जर १६ आमदारांचं निलंबन केल्यास शिवसेनेला इतर सर्वच बंडखोर आमदारांना अपात्र करता येईल. तसेच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो. तसेच राज्यात मध्यावधी निवडणुका देखील होण्याची शक्यता आहे. याचपार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

'पळून गेलेत त्यांच्यातही दोन गट, लवकरच समोर येईल'; आदित्य ठाकरेंचं मोठं विधान

सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाच्या निर्णयाच्या प्रतिक्षेमध्ये देश आहे. उद्या कळेल या देशात लोकशाही आणि न्यायव्यवस्था योग्य आहे की नाही. या निकालाकडे देशाचं लक्ष लागलं आहे, असं संजय राऊत म्हणाले. आमचा न्याय देवेतेवर पूर्ण विश्वास आहे. किती दबावाखाली न्याय व्यवस्थेचे काम चालू आहे, हे आम्हाला माहिती आहे. परंतु देशाला हे समजेल की, या देशाची न्याय व्यवस्था स्वतंत्र आहे. आम्हाला उद्या न्याय मिळेल, असं अपेक्षित आहे, असं संजय राऊतांनी सांगितलं.

दरम्यान, आमदारांच्या अपात्रतेबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा उद्याचा निर्णय घटनेनुसार आणि कायद्याला धरून असणे अपेक्षित आहे. उद्याच्या निकालावर महाराष्ट्र सह देशाचा लक्ष आहे. म्हणूनच मंत्रिमंडळाचा विस्तार थांबविला आहे. जर उद्याचा निर्णय सरकारच्या विरोधात गेला तर, पुन्हा एकदा महाराष्ट्रात भूकंप घडेल. सर्वोच्च न्यायालय काय निकाल देईल हे आता सांगता येत नाही, असं काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

...तर आम्ही मातोश्रीवर जाण्यास तयार; एकनाथ शिंदेंही काही बोलणार नाही- संतोष बांगर

मातोश्रीचे दरवाजे कायम खुले- शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे

आज आदित्य ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे. ज्यांना परत यायचंय त्यांच्याकरता मातोश्रीचे दरवाजे कायम खुले आहेत. जे पळून गेलेत त्यांच्यातही दोन गट आहेत. ते लवकरच समोर येईल, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. काही बंडखोर आमदारांच्या राक्षसी महत्वाकांक्षा आहोत. मात्र काही आमदारांना जबरदस्ती नेलं आहे, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच थोडी जरी लाज, हिंमत उरली असेल, तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरं जा, असं आव्हान देखील आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना दिलं आहे. 

टॅग्स :उद्धव ठाकरेएकनाथ शिंदेशिवसेनासंजय राऊतसर्वोच्च न्यायालय