Join us

भाजपाच्या खेळीने शिवसेना अडचणीत, मालमत्ता करमाफीच्या प्रस्तावावरून कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2018 6:07 AM

महापालिकेत सत्तेवर असूनही पाचशे चौरसफुटांपर्यंतच्या मालमत्तांचा कर माफ करण्याचे वचन पाळण्यात शिवसेनेला यश आलेले नाही़

मुंबई : महापालिकेत सत्तेवर असूनही पाचशे चौरसफुटांपर्यंतच्या मालमत्तांचा कर माफ करण्याचे वचन पाळण्यात शिवसेनेला यश आलेले नाही़ करमाफीचा प्रस्ताव आयुक्तांनी सादर करावा, अशी भूमिका घेत राज्य सरकारने शिवसेनेची कोंडी केली. निवडणुकीपूर्वी ही घोषणा अमलात आणून श्रेय खिशात घालण्यासाठी सेनेची धावपळ सुरू आहे़ सेनेच्या आमदारांनी पालिका आयुक्त अजय मेहता यांची सोमवारी भेट घेऊन प्रस्ताव नगरविकास खात्याकडे लवकर पाठविण्याची विनंती केली़मुंबईतील पाचशे चौ़ फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफीची घोषणा शिवसेनेने वचननाम्यातून केली होती़ पालिकेत सत्तेवर आल्यानंतर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या माध्यमातून सेनेने नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठविला. मात्र महापौरांना प्रस्ताव सादर करण्याचे अधिकार नाहीत़ आयुक्तांमार्फतच प्रस्ताव पाठविण्यास सांगून भाजपाने या प्रस्तावाचा चेंडू आयुक्तांच्या कोर्टात भिरकावला़ नगरविकास खात्यात प्रस्ताव वर्षभर रखडल्यानंतर आता निर्णय घेण्यास आयुक्तांना सांगितल्याने शिवसेनेत नाराजी आहे़>झारीतले शुक्राचार्य कोण?वर्षभर प्रस्तावावर कार्यवाही केली नाही़ प्रस्ताव अडविणारे झारीतले शुक्राचार्य कोण, असा सवाल शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि सुनील प्रभू यांनी आयुक्तांची भेट घेतल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केला़ शिवसेनेच्या आश्वासनांची पूर्तता होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे या झारीतल्या शुक्राचार्यांचा डोळाच शिवसेना फोडणार, ज्याचा डोळा फुटेल तो शुक्राचार्य असेल, असे सांगत शिवसेनेने भाजपाला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका