मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० हून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. दरम्यान, पक्षात पडलेल्या उभ्या फुटीनंतर शिंदेगट आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पक्ष आणि पक्षचिन्हावरून निवडणूक आयोगापासून न्यायालयापर्यंत लढाई सुरू आहे. दरम्यान, आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या मुंबईतील अंधेरी पूर्व या विधानसभा निवडणुकीसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून, शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईत फुटीनंतर पहिल्यांदाच निवडणूक होत असल्याने ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी पहिली परीक्षा मानली जात आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर ६ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगासमोर शिंदे गट आणि शिवसेनेत पक्षचिन्हावरून वाद असतानाच ही निवडणूक जाहीर झाल्याने या निवडणुकीपूर्वी धनुष्यबाणाबाबत निर्णय होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासह बिहारमधील दोन आणि हरियाणा, तेलंगाणा, उत्तर प्रदेश आणि ओदिशामधील प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यमक्रमानुसार ७ ऑक्टोबर रोजी निवडणुकीसाठी अधिसूचना जारी होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही १४ ऑक्टोबर आहे. १५ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ही १७ ऑक्टोबर आहे. ३ नोव्हेंबर रोजी मतदान होईल. तर ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल.