Join us

शिवसेनेच्या पहिल्या यादीत आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, वायकर, राठोड यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 7:04 AM

शिवसेनेने विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांना ए/बी फॉर्मचे वाटप दोन दिवसांपासूनच सुरू केलेले असताना, मंगळवारी अधिकृतपणे ६८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

मुंबई : शिवसेनेने विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांना ए/बी फॉर्मचे वाटप दोन दिवसांपासूनच सुरू केलेले असताना, मंगळवारी अधिकृतपणे ६८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.त्यात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे, जयदत्त क्षीरसागर, रवींद्र वायकर, संजय राठोड, अर्जुन खोतकर, दादा भुसे, गुलाबराव पाटील आदींचा समावेश आहे.अन्य पक्षांतून शिवसेनेत आलेले निर्मला गावित (इगतपुरी), पांडुरंग बरोरा (शहापूर), भास्कर जाधव (गुहागर), जयदत्त क्षीरसागर (बीड), अब्दुल सत्तार (सिल्लोड) यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुतणे आणि श्रीवर्धनचे (जि.रायगड) आमदार अवधूत तटकरे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली नाही. त्याऐवजी मुंबईतील माजी आमदार विनोद घोसाळकर यांना श्रीवर्धनचे तिकीट दिले. नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील हे हिंगोलीचे खासदार म्हणून निवडून गेले. आता नांदेड दक्षिणमध्ये त्यांची पत्नी जयश्री पाटील यांना उमेदवारी देण्यातआली आहे. एन्काऊन्टर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (नालासोपारा) यांना अपेक्षेप्रमाणे उमेदवारी मिळाली. शिवसेनेने आपल्या जुन्या अनेक शिलेदारांना पुन्हा संधी दिली आहे. शिवसेना भवन आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे घर ज्या मतदारसंघात आहे त्या माहीममध्ये शिवसेनेने विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना पुन्हा संधी दिली.पुणे आणि नागपूर या दोन शहरांमध्ये शिवसेनेला एकही जागा मिळालेली नाही. दुसरीकडेरत्नागिरी जिल्ह्यात भाजपला भोपळा मिळाला.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019