Join us

मीरा भाईंदर मेट्रोसाठी शिवसेनेच्या आंदोलनाची पहिली सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2018 7:35 PM

मीरा भार्इंदरच्या नागरिकांना पालिका निवडणुकीवेळी मेट्रो मंजूर केल्याचे आश्वासन देऊन वर्ष उलटले तरी मेट्रोच्या कामाला सुरवात न झाल्याने युवासेनेने आज मुख्यमंत्री व भाजपा नेतृत्वाच्या निषेधार्थ शहरात जागोजागी दहीहंडीचे थर रचले.

मीरारोड - मीरा भार्इंदरच्या नागरिकांना पालिका निवडणुकीवेळी मेट्रो मंजूर केल्याचे आश्वासन देऊन वर्ष उलटले तरी मेट्रोच्या कामाला सुरवात न झाल्याने युवासेनेने आज मुख्यमंत्री व भाजपा नेतृत्वाच्या निषेधार्थ शहरात जागोजागी दहीहंडीचे थर रचले. मेट्रोचे काम कधी सुरु होणार असे फलक व काळ्या रंगाचे टीशर्ट घालून युवासैनिकांनी शिवसेनेने मेट्रोसाठी जाहिर केलेल्या ५ आंदोलनांपैकी पहिल्या आंदोलनाची सलामी दिली.

दहिसर पूर्व पर्यंत येणारी मेट्रो मीरा-भार्इंदर शहरापर्यंत यावी, अशी मागणी शिवसेनेने सातत्याने चालवली आहे. महापालिका निवडणुकी दरम्यान एमएमआरडीएचे अध्यक्ष असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मंजूर केल्याचे जाहीर केले. मेट्रो स्थानकाची नावे ठरवली. पण आज वर्ष उलटले तरी मेट्रोच्या कामाला सुरवातच झाली नसून मुख्यमंत्री व भाजपाने नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप शिवसेनेने केला होता.

शहरात भार्इंदर पोलीस ठाणे नाका, जैन मंदिर, विमल डेरी नाका, नवघर नाका, गोडदेव नाका, सावरकर चौक (गोल्डन नेस्ट ) , मॅक्सस मॉल, सिल्वर पार्क, पेणकर पाडा, दिपक रुग्णालय नाका येथे दहिहंडीचे थर रचत मेट्रोचे फलक झळकावले. ढोल - ताशांच्या गजरात सेनेने हे आंदोलन केले.

मेट्रोसाठी आता गणेशोत्सवात महाआरती, नवरात्रीत प्रमुख चौकांमध्ये गरबा तर दिवाळीमध्ये मेट्रोचे काळे कंदील लावणार आहोत. त्या नंतर देखील शासनाने मेट्रोचे काम सुरु केले नाही तर शहरात जनआंदोलन उभे करुन एमएमआरडीएवर मोर्चा काढु असे आ. सरनाईक म्हणाले. 

टॅग्स :मीरा-भाईंदरमहाराष्ट्रराज्य सरकारदेवेंद्र फडणवीसशिवसेना