महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचे १५० जागांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:05 AM2021-02-10T04:05:12+5:302021-02-10T04:05:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईसह राज्यात कोरोना सुमारे ९७ टक्के नियंत्रणात आणण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कल्पक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईसह राज्यात कोरोना सुमारे ९७ टक्के नियंत्रणात आणण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कल्पक व नियोजनबद्ध नेतृत्व असून, दुसरीकडे पक्षबांधणीकडे तितकेच त्यांचे बारीक लक्ष आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी पालिका निवडणुकीत शिवसेनेचे १५० जागांचे लक्ष आहे. १९९६ साली मुंबई महानगर पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला असून, आजमितीस पालिकेत शिवसेनेचीच सत्ता आहे.आगामी पालिका निवडणूकीत शिवसेनेचा भगवा डोलाने फडकेल, असा ठाम विश्वास शिवसेनेचे प्रवक्ते, विभागप्रमुख, आमदार सुनील प्रभू यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
कांदिवली पश्चिम चारकोप येथे विभाग क्रमांक-२च्या वतीने नुकताच शिवसेनेचा मेळावा विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांनी आयोजित केला होता. यावेळी शिवसेना नेते, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई व आमदार सुनील प्रभू यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी शेकडो अल्पसंख्याक बांधवांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेनाप्रमुखांचे अल्पसंख्याक समाजावर असलेले प्रेम लक्षात घेता, समाजात मतभेद करणाऱ्या प्रवृत्तीला दूर ठेवण्याचे आवाहन सुभाष देसाई यांनी केले, तर आपल्या साक्षीने पालिकेवर भगवा फडकवण्याचे आवाहन आमदार प्रभू यांनी यावेळी केले.
-------------------------------