Join us

मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2018 10:25 PM

येत्या 25 जून रोजी होणाऱ्या मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी शिवसेनेने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

- मनोहर कुंभेजकरमुंबई- येत्या 25 जून रोजी होणाऱ्या मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी शिवसेनेने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेने विभाग क्रमांक 1 चे विभागप्रमुख विलास उर्फ भाई पोतनीस यांना उमेदवारी दिली असून, मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत कांदिवली पश्चिम येथील एकविरा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.शिवाजी शेंडगे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. कोकण पदवीधर मतदार संघातून ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे तर नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.या चारही ठिकाणी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत येथील उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला असल्याचा ठाम विश्वास शिवसेनेच्या सूत्रांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केला. काल रात्री मुसळधार पाऊस पडत असतांना दहिसर पूर्व येथील मातृछाया महाविद्यालयाजवळ असलेल्या शिवसेना शाखा क्रमांक 2 येथे भेट दिली असता उमेदवार विलास पोतनीस यांच्या निवडणुकीच्या व्ह्यूरचनेसाठी शिवसैनिकांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी भरपावसात शिवसैनिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.तर बोरिवलीत काल रात्री विलास पोतनीस व प्रा.शिवाजी शेंडगे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत शिवसेनेचे विभागक्रमांक 1 चे शिवसैनिक व शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.यावेळी शिवसेनेचे विधानपरिषदेतील गटनेते अँड.अनिल परब,शिवसेना उपनेते डॉ.विनोद घोसाळकर,उपनेते विश्वनाथ नेरुरकर,मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मारदर्शन केले.यावेळी पोतनीस व शेंडगे यांना विजयी करण्याचा निर्धार शिवसैनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शिक्षकांनी यावेळी व्यक्त केला.विधानपरिषदेतील एकूण संख्याबळ 76 असून सध्या शिवसेनेचे 11 आमदार आहेत.यामध्ये अलिकडेच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत नाशिक स्थानिक स्वराज संस्थेच्या मतदार संघातूननिवडून आलेले आमदार नरेंद्र दराडे व परभणी स्थानिक स्वराज संस्थेतून चमत्कार करून निवडून आलेले बिप्लो बजोरिया यांचा समावेश आहे.विधानपरिषदेतील शिवसेनेचे संख्या बळ वाढवण्यासाठी दस्तुरखुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी कंबर कसली आहे.उद्या दि,11 जून रोजी सायंकाळी 6 वाजता विलास पोतनीस व प्रा.शिवाजी शेंडगे यांच्या प्रचारार्थ वांद्रे पश्चिम रंगशारदा येथे शिवसेनेची महत्वाची सभा आयोजित करण्यात आली असून या निवडणुकीत विजय कसा मिळावायचा याची व्ह्यूरचना व कानमंत्र उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगणार आहेत.यावेळी मुंबईतील शिवसेनेचे खासदार,आमदार,शिवसेना नेते,शिवसेना उपनेते,मुंबईचे महापौर,सर्व 12 विभागप्रमुख,12 महिला विभागसंघटक,36 उपविभागप्रमुख,36 महिला उपविभागसंघटक,227 शाखाप्रमुख,227 महिला शखसंघटक,शिवसेनेचे सर्व नगरसेवक यांना आमंत्रित करण्यात आले आहे.