- मनोहर कुंभेजकर
मुंबई - आगामी निवडणूकांपूर्वी आणि येत्या 18 ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या दसऱ्या मेळाव्याला शिवसेना जोरदार शक्ति प्रदर्शन करणार असून लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर येणार आहेत.यादृष्टीने शिवसेनेची सध्या मुंबईतील 227 शाखांमधून शिवसेनेची जास्तीत जास्त शिवसैनिक या मेळाव्याला येण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.चलो शिवतीर्थ’ असा नारा देत राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य शिवसैनिक मुंबईत दाखल होणार आहेत.दसरा मेळावा रेकॉर्ड ब्रेकिंग करण्यासाठी शिवसेनेचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, विभागप्रमुख, नगरसेवक,पदाधिकारी यांनी जोरदार तयारी सुरू केल्याचे चित्र आहे.तर सोशल मीडियावरून देखिल या मेळाव्याच्या वेगवेगळ्या पोस्ट टाकल्या जात आहेत. गेल्या 23 जानेवारीला शिवसेनेच्या वरळी येथील राष्ट्रीय मेळाव्यात आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती.तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी खास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत मतोश्रीला भेट देऊन आगामी निवडणूकांसाठी युतीचा प्रस्ताव दिला होता.त्यामुळे या दसऱ्या मेळाव्यात युतीबाबत उद्धव ठाकरे काय भाष्य करतात याकडे भाजपासह इतर राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार दसऱ्याच्या मेळाव्याची जबाबदारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री(उपक्रम) एकनाथ शिंदे यांच्यावर टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.अलिकडेच मंत्रालयात एकनाथ शिंदे यांच्या दालनात या मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी महत्वाची बैठक झाली होती.या बैठकीत मुंबईचे महापौर प्रिं.विश्वनाथ महाडेश्वर,खासदार विनायक राऊत,आमदार व विभागप्रमुख सदा सरवणकर आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.
मुंबईतील 12 विभागप्रमुखांवर शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याची जबाबदारी टाकण्यात आली असून सध्या उपविभागप्रमुख आणि शाखाप्रमुख शिवसेनेच्या 227 शाखांमध्ये नगरसेवक,महिला शाखा संघटक,गटप्रमुख,आणि शिवसैनिकांच्या बैठका घेत आहेत.प्रत्येक शाखेला किमान 3 बसेस भरून शिवसैनिक आणण्याची जबाबदारी विभागप्रमुखांनी दिल्याचे समजते.तर सोशल मीडियाचा वापर करून बस मधून मेळाव्याला येणारे शिवसैनिक आपली नावे नोंदवत आहेत.
युवासेनाप्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे सरचिटणीस अमोल कीर्तिकर आणि आणि युवासेना पदाधिकारी देखिल हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सध्या मुंबईत ठिकठिकाणी बैठका घेत असल्याचे चित्र आहे.