विधि समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे हर्षद कारकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 01:50 AM2020-10-10T01:50:44+5:302020-10-10T01:51:27+5:30
महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षपदी राजराजेश्वरी रेडकर
मुंबई : महापालिकेतील विशेष समित्यांपैकी महत्त्वाच्या असलेल्या समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे हर्षद कारकर यांची शुक्रवारी निवड झाली तर महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या राजराजेश्वरी रेडकर यांची निवड झाली आहे. त्यांनी भाजपच्या उमेदवारांचा पराभव करीत अध्यक्षपद मिळविले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील विविध समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका सहा महिने लांबणीवर पडल्या होत्या. त्यामुळे या समित्यांमार्फत होणारी विकासकामे खोळंबली असल्याने अखेर आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून निवडणुका घेण्यात येत आहेत. त्यापैकी सहा विशेष समित्यांपैकी उर्वरित दोन विधि समिती आणि महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी पालिका मुख्यालयात पार पडली.
विधि समिती अध्यक्षपदी शिवसेनेचे हर्षद कारकर हे १८ मते मिळवून विजयी झाले तर भाजपचे अभिजित सामंत यांना १२ मते मिळाली. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या सुधा सिंग यांचा पराभव करीत शिवसेनेचे संतोष खरात हे १८ मते मिळवून विजयी झाले. महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या राजराजेश्वरी रेडकर या १८ मते मिळवून विजयी झाल्या तर भाजपच्या प्रीती सातम यांना १३ मते मिळाली. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या ऊर्मिला पांचाळ १८ मते मिळवून विजयी झाल्या. भाजपच्या रंजना पाटील यांना १३ मते मिळाली.