आदित्यजींनी गायनाचे छंद पूर्ण केले नाहीत, अमृता फडणवीसांना शिवसेनेचं प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 08:44 AM2020-02-27T08:44:03+5:302020-02-27T08:46:30+5:30
फडणवीस यांनी भाजपच्या आंदोलनावेळी आझाद मैदानातील भाषणात शिवसेनेवर टीका केली होती
मुंबई - राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याचदिवशी भाजपाने सरकारविरुद्ध आंदोलन पुकारले होते. त्यात, मुंबईतील आझाद मैदान येथील सभेत बोलताना वारिस पठाण यांच्या विधानावरुन फडणवीस यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. शिवसेनेनं बांगड्या भरल्या असतील, असे म्हणत टोला लगावला होता. त्यावर, फडणवीस यांनी माफी मागावी असे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी म्हटले होते. या वादात मिसेस फडणवीस यांनी उडी घेतली होती. आता, अमृता फडणवीस यांना शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलंय.
फडणवीस यांनी भाजपच्या आंदोलनावेळी आझाद मैदानातील भाषणात शिवसेनेवर टीका केली होती. वारिस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध करताना, शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील, आम्ही नाही, असे फडणवीस यांनी म्हटले होते. आदित्य ठाकरेंनी फडणवीस यांच्या या विधानावरुन त्यांना लक्ष्य केलं. ''महिला या सर्वात शक्तिशाली असून त्या बांगड्या परिधान करतात. राजकारण हे चालतच राहते, पण ही मानसिकता बदलायला हवी, असे म्हणत आदित्य यांनी फडणवीसांना माफी मागण्याचे आवाहन केलं होतं. त्यानंतर, आदित्य ठाकरेंच्या या ट्विटला देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.
आदित्य ठाकरेंच्या 'Bangles' ट्विटला अमृता फडणवीसांचा 'Pun' रिप्लाय
''रेशमी किड्याला आयुष्यातील ‘उपहास’ कधीच समजणार नाही, पूर्वजांनी विणलेल्या सुखासीन ‘रेशमी’ आयुष्याचा उपभोग घेतच त्यांची भरभराट होते, असे म्हणत अमृता यांनी आदित्य ठाकरेंना सर्वकाही आयतं मिळाल्याचं म्हटलं होतं. आता, अमृता फडणवीस यांच्या या टीकेला शिवसेनेच्या महिल्या प्रवक्त्यांनी उत्तर दिलंय.
प्रबोधनकार, मा. बाळासाहेब ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा वारसा लाभलेले श्री. आदित्यजी ठाकरे यांनी आपले वडील मुख्यमंत्री झाल्यावर (गायनाचे) छंद पूर्ण केले नाहीत; त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडविण्याचा छंद जोपासला आहे... @ShivSena@ShivsenaComms
— Dr.ManishaKayande (@KayandeDr) February 26, 2020
शिवसेना प्रवक्त्या आणि विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे यांनी रिट्विट करत अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली. आदित्य ठाकरे यांनी आपले वडील मुख्यमंत्री झाल्यावर (गायनाचे) छंद पूर्ण केले नाहीत. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडविण्याचा छंद जोपासला आहे, असे म्हणत अमृता फडणवीस यांना गायनाच्या छंदावरुन लक्ष्य केलं