"निवृत्त सैनिकाला झालेल्या मारहाणीमुळे सरकारची प्रतिमा काळवंडली, म्हणून शिवसेना खोटेपणावर उतरली"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 08:09 AM2020-09-14T08:09:11+5:302020-09-14T08:25:13+5:30
मुख्यमंत्र्यांचे आक्षेपार्ह व्यंगचित्र शेअर केल्याने शिवसैनिकांनी मारहाण केलेली व्यक्ती नौदलामध्ये नव्हती, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत आणि सोशल मीडियावरून करण्यात आला होता.
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील वाद संपतो न संपतो तोच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह व्यंगचित्र शेअर करणाऱ्या नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीचा विषय ऐरणीवर आला आहे. दरम्यान, सदर व्यक्ती ही नौदलामध्ये नव्हती, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत आणि सोशल मीडियावरून करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर आता भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी संबंधित माजी नौदल अधिकारी मदन शर्मा हे नौदलात सेवेत होते याचा पुरावाच सादर करून शिवसेनेची कोंडी केली आहे.
माजी नौदल अधिकारी असलेल्या मदन शर्मा हे नौदलात सेवेत होते, याचा पुरावा म्हणून, भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मदन शर्मांचे नौदलातून निवृत्त झाल्यानंतरचे ओळखपत्र ट्विटरवर शेअर केले आहे. या ट्विटमध्ये अतुल भातखळकर म्हणाले की, नौदलामधून चीफ इंजिनिर ऑफिसर म्हणून निवृत्त झालेले नौदल अधिकारी मदन शर्मा यांना केलेल्या मारहाणीमुळे ठाकरे सरकारची प्रतिमा पुरती काळवंडली आहे. त्यामुळे शिवसेना आता खोटेपणावर उतरली आहे. शर्मा हे कधी नौदलात नव्हतेच असा निलाजरा दावा संजय राऊत यांनी केला आहे. हा घ्या शिवसेनेच्या भुरटेपणाचा पुरावा.
चीफ इंजिनिर ऑफिसर म्हणून निवृत्त झालेले नौदल अधिकारी मदन शर्मा यांना केलेल्या मारहाणीमुळे ठाकरे सरकारचे थोबाड पुरते काळे झाल्यामुळे शिवसेना आता खोटेपणावर उतरली आहे. शर्मा हे कधी नौदलात नव्हतेच असा निलाजरा दावा संजय राऊत यांनी केला आहे. हा घ्या शिवसेनेच्या भुरटेपणाचा पुरावा. pic.twitter.com/W7DuIXNql4
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 13, 2020
दरम्यान, मदन शर्मा हे भारतीय नौदलात नव्हते तर मर्चंट नेव्हीमध्ये होते असे विधान संजय राऊत यांनी केले होते. तसेच सोशल मीडियावरूनही मदन शर्मा हे मर्चंट नेव्हीमध्ये असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र अतुल भातखळकर यांनी शेअर केलेल्या ओळखपत्रामुळे आता या प्रकरणावरून शिवसेनेची पुन्हा कोंडी होण्याची शक्यता आहे.
मग त्या हल्ल्याची जबाबदारी सरकारची कशी?, संजय राऊतांचा सवाल
शिवसैनिकांनी मुंबईत एका माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं व्यंगचित्र शेअर केल्यानं ही मारहाण करण्यात आली. त्यावरून विरोधकांनी सरकारला लक्ष्य करत कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला. 'घटनेनं निर्माण केलेल्या पदांवर असलेल्या व्यक्तींचा आदर राखणं नागरिकांचं कर्तव्य असतं. कोणीही आम्हाला विचारुन हल्ला करत नाही. मग त्या हल्ल्याची जबाबदारी सरकारची कशी?,' असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
कायदा सुव्यवस्था राखणं म्हणजे नेमकं काय, असा सवाल उपस्थित करत त्यांनी केंद्र सरकारला थेट लक्ष्य केलं. 'मुंबईत माजी नौदल अधिकाऱ्यावर हल्ला झाला. त्यांना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फोन केला. त्यांची विचारपूस केली. संरक्षणमंत्री यामध्ये फार रस घेत आहेत. उत्तर प्रदेशात कॅप्टनला गोळी घालण्यात आली होती. त्यावेळीही त्यांनी असाच फोन केला होता का?,' असा प्रश्न राऊत यांनी विचारला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले
शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी