या देशावर अन् महाराष्ट्रावर शिवसेनेचे अनंत उपकार - शिवसेना नेते संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 08:18 PM2019-10-08T20:18:13+5:302019-10-08T20:19:49+5:30
भाजपाने फसविले तर आमच्या व्यासपीठावर या, रडत कशाला बसता अजित पवारांसारखे, नेता कधी रडतो का?
मुंबई - बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकांवर केंद्र सरकारचं काम सुरु आहे, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री बाळासाहेबांच्या मार्गावर चाललेले आहेत. पाकव्याप्त काश्मीरवर हल्ला करुन पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या, अखंड महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण करा. उद्धव ठाकरेंमुळेच देशभरात श्रीरामाचं गजर पुन्हा होऊ लागला. एखादा विषय घेतला तर उद्धव ठाकरे कधीही सोडत नाही. या देशावर आणि महाराष्ट्रावर शिवसेनेचे अनंत उपकार आहेत अशा शब्दात संजय राऊत यांनी शिवाजी पार्कवर भाष्य केलं आहे.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, लाटा येतात अन् जातात, अशा अनेक लाटा शिवसेनेने पचविल्या आहेत. आपल्याला 288 जागांपैकी 124 जागा जिंकायच्या आहेत. प्रत्येक जागा आपल्यासाठी महत्वाची आहे. बहुजनांचा पक्ष कोणता असेल तर तो शिवसेनाच आहे. गरिबातल्या गरिब माणसाला आमदार, खासदार, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री बाळासाहेबांनी बनविले आहेत. हा महाराष्ट्र जातीपातीमध्ये वाटलेला असताना त्याला एकसंघ करण्याचं काम बाळासाहेबांनी केलं. बाळासाहेबांची शिवसेना 2019 च्या लढाईत फक्त विजयी करायची नाही तर ऐतिहासिक विजय मिळवायचा, आपला भगवा शुद्ध तेजाचा भगवा आहे तो मंत्रालयावर फडकवायचा आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच आमचं आदित्य नावाचं सूर्ययान 24 तारखेला महाराष्ट्राच्या सहाव्या मजल्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, महादेव जानकर, रामदास आठवले यांचे वक्तव्य काल ऐकलं. त्यांच्या ह्दृयात वेदना होती. भाजपाने फसविले तर आमच्या व्यासपीठावर या, रडत कशाला बसता अजित पवारांसारखे, नेता कधी रडतो का? असं सांगत संजय राऊतांनी भाजपावर अन् राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. त्याचसोबत काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष इतके थकले आहेत की दोघांना एकत्र येऊन वाटचाल करावी लागेल, हे लढायला उभे आहेत की गुडघे टेकून बसलेले आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्ष शिल्लक राहिला नाही, महाराष्ट्राचा पहिला निकाल कणकवली आणि कुडाळमधून होईल असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व ज्या पद्धतीने महाराष्ट्रात झळकतं आहे, नोटबंदीच्या विरोधात आवाज उठविण्याची कोणाची हिंमत नव्हती, तेव्हा सरकारमध्ये असून जनतेसाठी पहिला आवाज उद्धव ठाकरेंनी उचलला, आज संपूर्ण जग उद्धव ठाकरेंची भाषा बोलत आहे. युती महायुतीत देवाण-घेवाण होत असते. तडजोड करायची असते, आज एक पाऊल मागे घेतले म्हणजे यापुढे लांब उडी मारायची आहे. शिवसेनेने केलेलं काम नवीन पिढीपर्यंत पोहचलं पाहिजे, अनेक नवीन नवीन लोकं शिवसेनेत येतात. आमच्याकडे वॉशिंग मशिन नाही, जे वाल्मिकी आहेत त्यांनाचा प्रवेश दिला जात आहे असं सांगत एकप्रकारे भाजपाला टार्गेट केलं.