कंगनाच्या विरोधात शिवसेनेचे ‘जोडे मारा’ आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 04:34 AM2020-09-05T04:34:52+5:302020-09-05T04:35:52+5:30
चित्रपटांवर बहिष्कार टाकणार, महिला आघाडीने दिला इशारा
मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत हिच्या टिष्ट्वटमुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी मुंबईसह राज्यातील विविध भागांत निदर्शने केली. मुंबई पोलिसांचा अपमान तसेच मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटते, या कंगनाच्या टिष्ट्वटवर शिवसैनिकांनी आक्षेप घेतला. विशेषत: शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी कंगनाच्या पुतळ्याचे दहन केले, तसेच तिच्या पोस्टरवर जोडे मारा आंदोलन केले. शिवसेना भवनासमोर महिला आघाडीने कंगनाचा पुतळा जाळून जोरदार घोषणाबाजी केली, तर दिंडोशीत कंगनाच्या फोटोला जोडे मारा आंदोलन करण्यात आले.
ठाण्यात शिवसेनेने कंगनाच्या पोस्टरला फासले काळे
ठाणे : नेहमी वादग्रस्त विधाने करून किंवा बेधडक विधानांमुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्री कंगना रनौत हिने मुंबईविरुद्धच्या केलेल्या टिष्ट्वटनंतर राज्याच्या विविध भागांत याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. ठाण्यातही शिवसेनेच्या महिला आघाडीच्या रणरागिनींनी याविरोधात रस्त्यावर उतरून कंगनाच्या पोस्टरला काळे फासून जोडे मारा आंदोलन केले. तिला मुंबईमध्ये पाय ठेवू देणार नाही, असा इशाराही या वेळेस महिला आघाडीने दिला. ठाण्यात आनंद दिघे यांच्या शक्तिस्थळाजवळ हे आंदोलन करण्यात आले.
कंगना रनौत ही नेहमीच अशा प्रकारचे बालिश वक्तव्य करीत असते, असा टोला माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी लगावला. ती ९ सप्टेंबरला मुंबईत येत असेल तर तिचे शिवसेना स्टाईलने शिवसेना महिला आघाडी स्वागत करेल, असा इशाराही या वेळी देण्यात आला
.
कल्याणमध्येही आंदोलन
कल्याण : मुंबई पोलिसांबद्दल संतापजनक वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रनौत हिचा पुतळा कल्याणमधील शिवसैनिकांनी शुक्रवारी जाळून निषेध व्यक्त केला. कल्याण पूर्वेतील शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांच्या कार्यालयासमोरील गुडलक चौकात हा निषेध शिवसैनिकांनी व्यक्त केला.