कुर्ला भूखंडाचे प्रकरण शिवसेनेच्या अंगलट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 02:04 AM2018-12-04T02:04:34+5:302018-12-04T02:04:47+5:30
कुर्ला पश्चिम येथील भूखंडाचा प्रस्ताव फेटाळून केलेली चूक लक्षात आल्यानंतर शिवसेनेने घूमजाव केला खरा.
मुंबई : कुर्ला पश्चिम येथील भूखंडाचा प्रस्ताव फेटाळून केलेली चूक लक्षात आल्यानंतर शिवसेनेने घूमजाव केला खरा. मात्र, विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरीत सत्ताधाऱ्यांची कोंडी केली आहे. कुर्ला येथील भूखंडाचे श्रीखंड लाटण्याचा शिवसेना नेत्यांचा डाव उधळल्याचे श्रेय विरोधी पक्षांनी घेतले आहे. इतकेच नव्हे, या भूखंडाच्या संपादनाचा प्रस्ताव फेटाळण्याची उपसूचना मांडणाºया व मंजूर करणाºया शिवसेना नगरसेवकांच्या चौकशीची व राजीनाम्याची जोरदार मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे मनसेतून शिवसेनेत आल्यानंतर, सुधार समितीचे अध्यक्षपद मिळालेले दिलीप लांडे चांगलेच गोत्यात आले आहेत.
कुर्ला पश्चिम येथे काजूपाडा परिसरात असलेला सुमारे दोन हजार चौ.मी.चा भूखंड उद्यानासाठी आरक्षित आहे. हा भूखंड ताब्यात घेण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव पालिका महासभेत शिवसेनेने फेटाळला.
या प्रकरणी विरोधी पक्ष व भाजपाने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर, शिवसेना नेत्यांनी तत्काळ संबंधित भूखंडाचा प्रस्ताव पुन्हा एकदा महासभेत मंजुरीसाठी आणण्याची विनंती प्रशासनाला केली. भाजपानेही जुन्या मैत्रीला जागत हा पक्षांतर्गत विषय असल्याचे मत व्यक्त करीत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, विरोधकांनी भूखंडाचा विषय लावून धरला असून, या संभाव्य घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली आहे.
मनसेत असताना नगरसेवक दिलीप लांडे यांनी भूखंडाच्या प्रस्तावास विरोध केला होता. मनसेतून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर लांडे
यांनी विरोध कायम ठेवून, सुधार समितीचे माजी अध्यक्ष अनंत नर यांच्यामार्फत उपसूचना मांडत हेतू साध्य केला, असा आरोप विरोधकांनी केला. १३ डिसेंबर रोजी होणाºया महासभेत भूखंड संपादनाचा प्रस्ताव न आणल्यास सभागृह चालू देणार नाही. आरक्षित भूखंड मुंबईकरांसाठी असून, वेळ पडली तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा विरोधी पक्ष नेते रवी राजा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव आणि समाजवादीचे गटनेते रईस शेख यांनी दिला.
>मामा बनविणाºयांचा निषेध; मनसेची बॅनरबाजी
या प्रकरणी मनसेने दिलीप लांडे यांना लक्ष्य करत बॅनरबाजी केली आहे. लांडे यांना राजकीय वर्तुळात ‘मामा’ नावाने संबोधले जाते. याच संबोधनाचा वापर करत ‘चांदिवली विधानसभा मतदारसंघातील उद्यानाचा भूखंड बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत महानगरपालिकेला मामा बनवणाºया लोकप्रतिनिधीचा जाहीर निषेध’, असे बॅनर मनसेने चांदिवली परिसरात लावले आहेत.
>पालिकेच्या कारभाराचीच चौकशी करा
कुर्ला येथील भूखंडाबाबत काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत संबंधितांची कानउघाडणी केल्याच्या बातम्या आल्या. आता पुन्हा तसाच प्रस्ताव हे नगरसेवक आणत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या सगळ्या कारभाराची चौकशी झाली पाहिजे.
- नसीम खान, स्थानिक आमदार, काँग्रेस