Join us

शिवसेनेच्या आजींनी जितेंद्र आव्हाडांचंही जिंकलं मन; भेटण्यासाठी घरी जाणार असल्याचं केलं ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 6:22 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील चंद्रभागा आजींचं कौतुक केलं आहे. 

मुंबई- मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करू असं आव्हान खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांनी दिलं होतं. त्यानंतर काल दिवसभर शिवसैनिक मोठ्या संख्येन उपस्थित होते. त्यात एका ज्येष्ठ आजींचादेखील सहभाग होता. चंद्रभागा शिंदे असं या आजींचं नाव आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आजींची विचारपूस केली. त्यानंतर आता मुख्यमंत्री सहकुटुंब या आजींच्या भेटीसाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी परळला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

शिवसेनेच्या या आजींची सध्या राज्यभर जोरदार चर्चा सुरु आहे. विविध लोक या आजींचं कौतुक करत आहे. आता खुद्द मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील चंद्रभागा आजींचं कौतुक केलं आहे. येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी गेले २-३ दिवस मातोश्रीच्या बाहेर तुफान गर्दी होती. त्या गर्दीत एक म्हातारी आजी देखील उभी होती. तीचे वय बघितले तर ती त्या गर्दीत काय करत होती. हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येईल. पण ह्यालाच म्हणतात निष्ठा! शिवसेनेची सर्वात मोठी ताकद, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. 

तसेच आजकालच्या जगात तळहातावरच्या फोडासारखे जपलेली लोक ही कधी पाठीत खंजीर खुपसतील हे सांगता येत नाही. मी त्या आजींच्या घरी जाऊन त्यांची भेट घेणार व त्यांच्या पाया पडणार, असंही जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरद्वारे म्हटलं आहे. 

दरम्यान, राणा दाम्पत्यानं थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान दिल्यानंतर शाखा क्रमांक २०२ च्या शिवसैनिक असलेल्या चंद्रभागा आजी मातोश्राबाहेर ठाण मांडून बसल्या. राणा दाम्पत्यानं मातोश्रीवर येऊनच दाखवावं. आम्ही गुपचूप येऊ आणि हनुमान चालिसा म्हणून जाऊ, असं राणा दाम्पत्याला वाटलं असेल. पण तसं काही आम्ही होऊ देणार नाही, असं चंद्रभागा आजी म्हणाल्या. आजींचा उत्साह पाहून त्यांच्यासोबत युवासैनिकांनी 'राणा दाम्पत्य कायर है, आजी आमची फायर है' अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.

रणरणत्या उन्हात ठिय्या देऊन बसलेल्या चंद्रभागा आजींची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विचारपूस केली. त्यांना काळजी घेण्यास सांगितलं. बाळासाहेब ठाकरेंपासून मी शिवसेनेत आहे. पक्षासाठी रक्ताचं पाणी केलं आहे. मातोश्रीला कोणी आव्हान देत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. राणा दाम्पत्यानं मातोश्रीवर येण्याची हिंमत करूनच दाखवावी, असं आव्हानच त्यांनी दिलं. मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवर बोलवून विचारपूस केल्यानंतर आजींनी 'झुकेगा नहीं' असं म्हणत माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती.

टॅग्स :जितेंद्र आव्हाडशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसउद्धव ठाकरे