Join us  

वाढीव शुल्कास शिवसेनेचा विरोध

By admin | Published: February 05, 2016 3:51 AM

मुंबईबाहेरच्या रुग्णांना पालिका रुग्णालयांमध्ये जादा शुल्क आकारण्याच्या आयुक्तांच्या प्रस्तावाने शिवसेना अडचणीत आली आहे़

मुंबई : मुंबईबाहेरच्या रुग्णांना पालिका रुग्णालयांमध्ये जादा शुल्क आकारण्याच्या आयुक्तांच्या प्रस्तावाने शिवसेना अडचणीत आली आहे़ निवडणुकीच्या तोंडावर हा प्रस्ताव विरोधकांसाठी आयते कोलीत ठरणार असल्याने शिवसेनेने आज माघार घेत अशा शुल्क आकारणीला विरोध दर्शविला आहे़ मात्र परराज्यातून येणाऱ्या रुग्णांचा वैद्यकीय खर्च त्या-त्या राज्याने उचलावा, अशी सूचना शिवसेनेने केली आहे़मुंबईबाहेरील रुग्णांची संख्या ४५ टक्क्यांवर पोहोचली आहे़ यामुळे पालिकेच्या तिजोरीवर भार पडत असल्याने मुंबईबाहेरील रुग्णांकडून वैद्यकीय सेवेसाठी जादा शुल्क घेण्याचा प्रस्ताव सन २०१६-२०१७च्या अर्थसंकल्पात प्रशासनाने मांडला आहे़ यावर सर्व विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे़ त्यामुळे सेनेने आज घूमजाव करीत महाराष्ट्रातून येणाऱ्या रुग्णांकडून वाढीव शुल्क घेऊ देणार नाही, अशी भूमिका मांडली़ गरिबांकडून वैद्यकीय सेवेसाठी पैसे घेणे योग्य नाही़ परंतु पूर्वी काही राज्यांचे सरकार त्यांच्या राज्यातील रुग्ण मुंबईत किंवा खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्यास त्यांचा खर्च देत होते़ पालिका रुग्णालयात दर्जेदार सेवा मिळत असल्याने मुंबईबाहेरील रुग्ण येथे येत असतात़ त्याप्रमाणे राज्य सरकारनेही अशी यंत्रणा उभी करावी, अशी सूचना करीत या प्रस्तावाचा चेंडू राज्य सरकारकडे टोलविला आहे़ (प्रतिनिधी)