सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेचा 'महागाई'वरुन भाजपावर वार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 07:52 AM2017-12-14T07:52:32+5:302017-12-14T07:55:14+5:30
केंद्रात आणि राज्यात सत्तेमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेने पुन्हा एकदा महागाईच्या मुद्यावरुन भाजपाला लक्ष्य केले आहे.
मुंबई - केंद्रात आणि राज्यात सत्तेमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेने पुन्हा एकदा महागाईच्या मुद्यावरुन भाजपाला लक्ष्य केले आहे. महागाईच्या मुद्यावरुन उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. नोटाबंदी आणि जीएसटीची चुकीची अंमलबजावणी यामुळेच महागाई भडकल्याचा आरोप उद्धव यांनी केला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही आपल्याकडील पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होत नसतील तर महागाई उच्चांक गाठणारच असे उद्धव यांनी म्हटले आहे.
महागाईने जो उच्चांक गाठला आहे तो मागील १५ महिन्यांतील आहे हे लक्षात घेतले पाहिजे. नैसर्गिक आपत्तीचा परिणाम तात्कालिक असतो. त्यामुळे काही काळापुरती दरवाढ होते. मात्र महागाई जेव्हा १५ महिन्यांतील उच्चांक गाठते किंवा औद्योगिक उत्पन्नाची घसरणही कायमच राहते तेव्हा त्याचे खापर फक्त निसर्गाच्या तडाख्यावर कसे फोडता येईल ? असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून विचारला आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात
- महागाईच्या तांडवाने सामान्य माणसाचे जीवन साफ कोलमडले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘सखी सैया तो खूब ही कमात है, महंगाई डायन खाए जात है’ या गाण्याचा जोरदार वापर विद्यमान सत्ताधाऱ्यांनी केला होता. सत्तांतर होण्यात या गाण्याचाही वाटा होताच. मात्र तीन वर्षांनंतरदेखील महंगाई डायन बाटलीबंद होऊ शकलेली नाही. नोटाबंदी आणि जीएसटीने अर्थव्यवस्था सुधारल्याचा दावा करणाऱ्यांचे त्यावर काय म्हणणे आहे.
- नोटाबंदी आणि जीएसटीमुळे गटांगळ्या खाणारी देशाची अर्थव्यवस्था सुधारल्याचे ढोल राज्यकर्त्यांनी गेल्याच महिन्यात ‘मूडीज्’ने वाढविलेल्या मानांकनाचा हवाला देत पिटले. मात्र आता महागाईने उच्चांक गाठल्याने हे ढोल पुन्हा ‘फोल’ ठरले आहेत. देशाच्या विकासदरात वृद्धी झाल्याचाही गाजावाजा गेल्या महिन्यात बराच केला गेला. मात्र औद्योगिक उत्पन्नाचा निर्देशांकदेखील घसरला आहे. म्हणजे जी महागाई ऑक्टोबरमध्ये ३.५८ टक्क्यांवर स्थिरावली होती ती थेट ४.८८ टक्क्यांपर्यंत वाढली आहे आणि सप्टेंबरअखेर जो औद्योगिक उत्पन्न निर्देशांक ३.८ टक्के होता तो २.२ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. रिझर्व्ह बँकेने अलीकडेच पतधोरण जाहीर करताना महागाई वाढू शकते असा इशारा दिला होता तो खरा ठरला आहे. इंधन आणि भाज्यांच्या दरवाढीमुळे महागाईने उच्चांक गाठला असे एक कारण त्यासाठी दिले जात आहे. नोव्हेंबरमध्ये पडलेला पाऊस आणि ‘ओखी’ वादळाचा तडाखा याकडेही बोट दाखविले जात आहे. ही कारणे मान्य केली तरी महागाईने जो उच्चांक गाठला आहे तो मागील १५ महिन्यांतील आहे हे लक्षात घेतले पाहिजे. नैसर्गिक आपत्तीचा परिणाम तात्कालिक असतो. त्यामुळे काही काळापुरती दरवाढ होते. ?
- मात्र महागाई जेव्हा १५ महिन्यांतील उच्चांक गाठते किंवा औद्योगिक उत्पन्नाची घसरणही कायमच राहते तेव्हा त्याचे खापर फक्त निसर्गाच्या तडाख्यावर कसे फोडता येईल? या वर्षी तर पाऊसपाणीही बरे राहिले. दिवाळीपर्यंत पाऊस रेंगाळला किंवा आता ‘ओखी’ वादळाचाही तडाखा बसला हे मान्य केले तरी केवळ तेवढ्यामुळे महागाईने उच्चांक गाठला असे कसे म्हणता येईल? खरे म्हणजे नोटाबंदी आणि जीएसटीची चुकीची अंमलबजावणी हे सरकारनिर्मित तडाखेच सध्याच्या परिस्थितीसाठी जास्त कारणीभूत म्हणावे लागतील. गेल्या महिन्यात ‘मूडीज्’ने देशाच्या अर्थव्यवस्थेचे मानांकन वाढवले. १३ वर्षांनंतर ही मानांकनवृद्धी झाल्याने सरकारनेही ‘अर्थव्यवस्था सुधारली होsss’ असे ढोल पिटले. नोटाबंदी आणि जीएसटीच्या तडाख्यातून अर्थव्यवस्था सावरल्याचाच हा पुरावा आहे असे सांगितले गेले. विकास दर वाढल्याचाही डंका पिटला गेला. विकास दरात वृद्धी झाली हे सरकारचे म्हणणे खरे मानले तर औद्योगिक उत्पन्नात वाढ नाही तरी निदान त्याची घसरण थांबायला हवी होती. तसेही झालेले नाही. कारणे काहीही असली तरी महागाईचे भूत सामान्य माणसाच्या मानगुटीवरून उतरलेले नाही आणि त्याचे जिणे हराम करीतच आहे. कधी तूरडाळ शंभरी गाठते तर कधी टोमॅटो. कधी कडधान्ये महाग होतात, कधी भाज्यांचे भाव आकाशाला भिडतात तर कधी अंड्यांच्या किमती आवाक्याबाहेर जातात. कांदा तर नेहमीच सामान्यांच्या डोळ्यातून अश्रू काढतो.
- आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही आपल्याकडील पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होत नसतील तर महागाई उच्चांक गाठणारच. विकासाचा उच्चांक गाठल्याचा दावा विद्यमान राज्यकर्ते नेहमीच करतात. उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जो काही विजय मिळाला तोदेखील त्यांना ‘विकासाचा विजय’ वाटतो. गुजरातच्या निवडणुकीत होणारा ‘विकास गांडो थयो छे’ हा आरोप त्यांना अपप्रचार वाटतो. विरोधकांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत असे ते म्हणतात. ‘विकास गांडो थयो’ की नाही, विरोधकांचे आरोप खरे की खोटे हे मुद्दे बाजूला ठेवले तरी महागाईने १५ महिन्यांतील उच्चांक गाठला आहे हे कसे नाकारता येईल? महागाईच्या या तांडवाने सामान्य माणसाचे जीवन साफ कोलमडले आहे. जे दारिद्र्यरेषेवरील आहेत त्यांना महागाईचा मार बसत आहे तर जे दारिद्र्यरेषेखालील आहेत त्यांना ‘आधार’ निराधार बनवीत आहे, रेशनवरील स्वस्त धान्यापासून वंचित ठेवून ‘भूकबळी’ होण्यास मजबूर करीत आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘सखी सैया तो खूब ही कमात है, महंगाई डायन खाए जात है’ या गाण्याचा जोरदार वापर विद्यमान सत्ताधाऱ्यांनी केला होता. सत्तांतर होण्यात या गाण्याचाही वाटा होताच. मात्र तीन वर्षांनंतरदेखील महंगाई डायन बाटलीबंद होऊ शकलेली नाही. नोटाबंदी आणि जीएसटीने अर्थव्यवस्था सुधारल्याचा दावा करणाऱ्यांचे त्यावर काय म्हणणे आहे?