मुंबई : कोरोना लॉकडाऊन जाहिर झाल्यानंतर २० हून अधिक वेळा पेट्रोलडिझेलच्या दरात वाढ झाली. पेट्रोलच्या किमती ९३ रुपयांवर तर डिझेल दरवाढ ८० रुपयांवर पोहोचले. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरही दिवसेंदिवस वाढत आहेत. इंधन दरवाढीचा भडका उडवून केंद्र सरकारने चालवलेल्या सर्वसामान्यांच्या लुटीविरोधात शिवसेनेने आज आक्रमक पवित्रा घेतला. शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार "केंद्र सरकारने लादलेल्या पेट्रोल-डिझेल-गॅस इंधन दरवाढी विरोधात" संपूर्ण राज्यात जनआंदोलन करण्यात आले. आज सकाळी पश्चिम दुर्तगती महामार्गासमोरील बोरिवली पूर्व येथे ओंकारेश्वर मंदिर ते बोरिवली स्थानकापर्यंत बैलगाडी-सायकल मार्च आणि प्रचंड जनसमुदायासह विभाग क्रमांक 1 च्यावतीने महामोर्चा काढण्यात आला. विभागप्रमुख आणि आमदार विलास पोतनीस यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
या प्रसंगी महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे,शिक्षण समिती अध्यक्षा संध्या विपुल दोशी, प्रभाग समिती अध्यक्षा सुजाता उदेश पाटेकर आणि मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ तसेच शिवसेना नगरसेवक, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख आणि इतर पदाधिकारी, शिवसैनिक आणि निषेध व्यक्त करण्यासाठी नागरिक देखिल सहभागी झाले होते. यानंतर इंधनाचे दर आटोक्यात आणले जातील अन्यथा सामान्य जनतेसाठी शिवसेनाचा हा लढा असाच सुरू राहील असे आमदार पोतनीस यांनी सांगितले.
गोरेगावात जनआंदोलन
शिवसेना नेते, उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन किर्तीकर यांच्या मार्गर्शनाखाली विभागप्रमुख, मुख्य प्रतोद, आमदार सुनिल प्रभु, आमदार रवींद्र वायकर व विधानसभा संघटक व जेष्ठ नगरसेविका साधना माने यांच्या नेतृत्वाखाली गोरेगाव रेल्वे स्थानक परिसरात जोरदार निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारचा गैरकारभार, पेट्रोल-डिझेल दरवाढीचा जनतेवर भार!, रद्द करा, रद्द करा, इंधन दरवाढ रद्द करा....,सारी जनता एक हो, एक होके केंद्र सरकार को फेक दो...केंद्र सरकार मुर्दा बाद.... केंद्र सरकार हाय हाय... अशा जोरदार घोषणांनी गोरेगाव पूर्व रेल्वे स्थानक परिसर शिवसैनिकांनी दणाणून सोडला होता.