शिवसेनेच्या वचननाम्याचे बेस्टला टेन्शन
By admin | Published: January 26, 2017 03:46 AM2017-01-26T03:46:28+5:302017-01-26T03:46:28+5:30
आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला शिवसेनेच्या वचननाम्याने शॉक दिला आहे. महापालिकेतच बेस्टचा अर्थसंकल्प सामाविष्ट करण्याची घोषणा झाली.
मुंबई : आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला शिवसेनेच्या वचननाम्याने शॉक दिला आहे. महापालिकेतच बेस्टचा अर्थसंकल्प सामाविष्ट करण्याची घोषणा झाली. मात्र, याबरोबरच गणवेशातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवासाचे वचन शिवसेनेने दिले आहे, परंतु महसुलाचे पर्याय तोकडे पडत असताना, या नवीन सवलतीमुळे २५ कोटी रुपयांच्या या महसुलावरही पाणी फेरले जाणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी वचननामा जाहीर केला. फेब्रुवारी २०१७ च्या निवडणुकीसाठी मैदानात उतरताना, अनेक घोषणाबाजी व वचनांची उधळण त्यांनी केली आहे. यापैकी बरीच वचने जुनीच असल्याचे दिसून येत असताना, नवीन आश्वासनाने बेस्टचे टेन्शन वाढवले आहे. सुमारे ५६० कोटी रुपये तुटीत असलेले बेस्ट उपक्रम आर्थिक मदतीच्या अपेक्षेत आहे. महापालिकेत गेली २१ वर्षे सत्तेवर असलेल्या शिवसेनेकडून याबाबत ठोस आश्वासन मिळतील, अशीही अपेक्षा होती.
मात्र, शालेय विद्यार्थ्यांना मोफत प्रवास या नवीन योजनेने बेस्टसमोर नवीन अडचण उभी केली आहे. तिकिटांमधून मिळणाऱ्या उत्पन्नातूनच बेस्टची गाडी रस्त्यावर धावत आहे. तरीही हा विभाग तोट्यातून असून, खासगी वाहतूक, मोनो-मेट्रो यामुळे बेस्टचा प्रवासी वर्ग झपाट्याने घसरत आहे. अशा वेळी आहेत त्या प्रवाशांना सवलत दिल्यास उत्पन्न काय मिळणार? अशी नाराजी बेस्टमधून दबक्या आवाजात व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)