VJTIच्या दीक्षांत समारंभात जिजाऊंचा अपमान; शिवसेनेच्या दणक्यानंतर संचालकांनी मागितली माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 02:02 PM2018-02-26T14:02:17+5:302018-02-26T14:02:17+5:30
माटुंगा येथील वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभात वीरमाता जिजाबाई भोसले यांचा अवमान झाल्याचा आरोप करत शिवसेना आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने व्हीजेटीआय महाविद्यालयाबाहेर निदर्शने सुरू केली आहेत.
मुंबई - माटुंगा येथील वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभात वीरमाता जिजाबाई भोसले यांचा अवमान झाल्याचा आरोप करत शिवसेना आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने व्हीजेटीआय महाविद्यालयाबाहेर निदर्शने केली. शिवसेनेचा आक्रमक पवित्रा पाहून संचालक धीरेन पटेल यांनी मराठीत लेखी माफिनामा दिला आहे. संचालकांना वीरमातेचे नाव लिहिण्यास लाज वाटत असल्यास त्यांनी पदाचा राजीनामा देण्याची मागणी करत संघटनेने व्हीजेटीआयवर हल्लाबोल केला.
दीक्षांत समारंभात झालेल्या अवमानप्रकरणी संचालकांनी जाहीर माफी मागावी,अन्यथा त्यांना सोडणार नाही, असा इशाराच शिवसैनिकांनी आंदोलनादरम्यान दिला होता. राष्ट्रमातेचा अपमान कदापी सहन करणार नाही. जर माफी मागितली नाही, तर संचालकांना उग्र आंदोलनाचा सामना करावा लागेल, असा इशारा महिला उपविभाग संघटक माधुरी मांजरेकर यांनी दिला. तर शिवसेना प्रवक्त्या प्रा. मनीषा कायंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळ व्हीजेटीआयचे संचालक धीरेन पटेल यांना भेटण्यासाठी महाविद्यालयात शिरले. दीक्षांत समारंभास खुद्द शिक्षण मंत्री विनोद तावडे उपस्थित असताना अशी चूक होणे अधिक संतापजनक असल्याची प्रतिक्रिया कायंदे यांनी व्यक्त केली.
दरम्यान भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळाला संचालक बैठकीत व्यस्त असल्याचा निरोप आल्याने शिवसैनिकांनी संचालक कार्यालयाबाहेल घोषणाबाजी सुरू केली. शिवसैनिकांची घोषणाबाजी ऐकूण संचालक तत्काळ शिष्टमंडळाच्या भेटीस आले. संचालकांनी जबाबदारी स्विकारत याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. शिक्षक सेनेच्या शिष्टमंडळाने मराठीत माफीनामा घेतल्यानंतर आंदोलनाची सांगता केली.
संचालकांना निवेदन देताना शिक्षक सेनेचे शिष्टमंडळ
शिक्षक सेनेच्या शिष्टमंडळाने मराठीत मागितला माफीनामा