'त्या' बंगल्याचे CCTV फुटेज काढा, कॉल रेकॉर्ड उघड करा; राऊतांच्या आरोपावर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 04:17 PM2024-01-31T16:17:47+5:302024-01-31T16:18:48+5:30
आम्ही उद्या आरटीआय टाकणार आहोत आणि येणाऱ्या काळात खिचडी घोटाळ्यामध्ये सहभागी असलेल्या लोकांची नावे जाहीर करणार आहोत असा इशाराही अमेय घोले यांनी दिला.
मुंबई - Shivsena on Sanjay Raut ( Marathi News ) उबाठा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी आमच्यावर केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. तथ्यहीन आहेत. ते खिचडी घोटाळ्यासंदर्भात बोलले. ज्या लोकांची चौकशी सुरु आहे. त्यात त्यांच्या आजूबाजूचेच लोक आहेत. मी १० महिने आरोग्य समिती अध्यक्ष असताना इतर खूप लोकांवर मग ते महापौर असोत, किंवा इतर कोणीही असोत. त्यांच्यावर आरोप व्हायचे परंतु त्या काळात व नंतरच्या काळात, म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळात आणि नंतर युती सरकार आल्यानंतर, दोन्ही कार्यकाळात माझ्यावर कुठलाही आरोप करण्यात आला नव्हता. किंवा कुठल्याही एजन्सीची केस माझ्यावर नाही आहे. मी फक्त एकनाथ शिंदे यांच्या प्रेमापोटी पक्षात आलेलो आहे. ज्यांच्यावर केसेस आहेत त्या सर्वांची नावे पब्लिक वेब पोर्टलवर सुद्धा उपलब्ध आहेत. त्यापुढे जर कुठलीही माहिती हवी असल्यास आरटीआय टाकून ती माहिती आपण मिळवू शकता. उलटपक्षी पण ज्या त्यांच्या लोकांची नावे घोटाळ्यात जगजाहीर झालेली आहेत. त्यांनी केलेले व्यवहार जगासमोर आलेले आहेत. पण याबाबतीत त्यांनी कधीही खुलासा केलेला नाही असा पलटवार आदित्य ठाकरेंच्या २ माजी विश्वासू सहकाऱ्यांनी संजय राऊतांसह ठाकरे गटावर केला आहे.
युवासेनेचे सरचिटणीस अमेय घोले आणि राहुल कनाल यांनी आज पत्रकार परिषद घेत संजय राऊतांच्या आरोपांवर उत्तर दिले. अमेय घोले यावेळी बोलले की, आम्हाला संजय राऊतांना एक प्रश्न विचारायचा आहे, जे लोक यांचे दौरे सांभाळायचे ते सुनील बाळा कदम, सुजित पाटकर यांचे बँक अकाउंट मध्ये ट्रान्स्फर आलेले आहेत. जर आम्ही खोटे बोलत असू, तर तुम्ही सीसी टीव्ही फुटेज शोधा. कोविडच्या काळात व कोविड नंतर हे लोक महापौर बंगल्यावर का जायचे? कुठल्या अधिकाराने जायचे? किती अधिकाऱ्यांना राऊतांचे फोन गेलेत, हे रेकॉर्ड काढा, सगळ्यांचे रेकॉर्डस् आहेत. आम्ही ऑन रेकॉर्ड ऑन फॅक्ट्स बोलतो. राऊतांचे फोन कोणाकोणाला जायचे, कुठल्या अधिकाऱ्यांना जायचे आणि त्यांच्यात काय संभाषण व्हायचे याची माहिती सुद्धा संजय राऊत यांनी द्यावी. सुजित पाटकर, सुनील बाळा कदम किंवा इतर कुणीही असोत. या घोटाळ्यात जे जे लोक सापडले आहेत. जे ईडी व इतर संस्थांनी सिद्ध केलेले आहेत. यात आमची नावे कुठेही नाहीत. फक्त खिचडी नाही तर तर इतर मेडिकल एजन्सीज आहेत त्यांची तुम्ही काढा. यात सुनील बाळा कदम आणि सुजित पाटकर कुठे कुठे सहभागी आहेत ते कळेल असं प्रत्युत्तर देत त्यांनी उबाठा नेते संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेतला.
तसेच संजय राऊत यांना आमचे सांगणे आहे की पुढच्या ३० ते ४५ दिवसांत तुम्ही आरटीआय टाका, आम्ही सुद्धा आरटीआय टाकतो. आम्ही पुरावे सादर करतो, तुम्ही सुद्धा तुमच्या वतीने पुरावे सादर करा. एकत्र पत्रकार परिषद घ्या किंवा वेगवेगळी पत्रकार परिषद घ्या आमची कसलीही तयारी आहे. त्यात कुणाकुणाची नावे येत आहेत, ते सर्वाना कळू दे. कोण किती पाण्यात आहे ते सर्वाना कळू द्या. कोण कुठल्या कामासाठी फोन करायचे, वरळी हिल टॉप हॉटेल मध्ये कुठला कारकून या दोन वर्षांत कामे करत होता आणि ९० ते १०० कोटींचे फंड कसे गायब झाले याची माहिती सुद्धा राऊत साहेबांनी द्यावी. हिल टॉप हॉटेलचे सर्व सीसीटीव्ही चेक करा. कुठले पीडब्ल्यूडीचे अधिकारी हिल टॉप हॉटेलच्या कुठल्या कारकुनाला भेटले होते याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आम्ही उद्या आरटीआय टाकणार आहोत आणि येणाऱ्या काळात खिचडी घोटाळ्यामध्ये सहभागी असलेल्या लोकांची नावे जाहीर करणार आहोत असा इशाराही अमेय घोले यांनी दिला.
दरम्यान, मी बाळासाहेब भवन मध्ये बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो की, जर माझे आणि अमेय घोलेचें नाव कुठल्याही घोटाळ्यात आढळले, मग तो रेमिडिसवेअर चा घोटाळा असो, बॉडी बॅग घोटाळा असो किंवा खिचडी घोटाळा असो, यातील कुठल्याही घोटाळ्यात माझे किंवा अमेय घोले यांचे नाव आढळले तर आम्ही आमच्या राजकीय कारकिर्दीचा राजीनामा देऊ. आमच्यात हे धाडस आहे. पण संजय राऊत यांच्यात हे धाडस आहे का? जर धाडस असेल तर तर त्यांनी वंदनीय बाळासाहेबांची शपथ घ्यावी की जर आमचे नाव कुठल्याही घोटाळ्यात आढळले नाही तर राज्यसभेतील खासदारकीचा राजीनामा द्याल. असे बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगा. पण जर तुम्ही खरे बोलत आहात अशी तुमची खात्री असेल तर तुम्ही जनतेसमोर मीडियासमोर येऊन बोला, तुम्हाला हवा तितका वेळ घ्या आणि आमच्याविरोधात पुरावे सादर करा. जर आम्ही दोषी आढळलो, तर आम्ही कायदेशीर कारवाईला सामोरे जायला सुद्धा तयार आहोत. मी राजकारण सोडून द्यायला तयार आहे. पण तुम्ही चुकीचे ठरलात तर तुम्ही खासदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहात का असा थेट सवाल राहुल कनाल यांनी संजय राऊतांना विचारला आहे.