शिवसेनेची ‘रॉकेट’भरारी, मनसेला आपटीबार तर भाजपाही घायाळ; सहा नगरसेवक ‘शिवबंधनात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 04:14 AM2017-10-14T04:14:52+5:302017-10-14T04:15:15+5:30

‘मुंबई महापालिकेत लवकरच आमचा महापौर बसवू’ अशी बतावणी करणाºया भाजपाला शिवसेनेने शुक्रवारी जोरदार धक्का दिला. महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या सातपैकी सहा नगरसेवकांना शिवसेनेत घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार षटकारच लगावला.

Shiv Sena's Rocket Bharari, MNS to Oppati and BJP also injured; Six corporators 'Shivbandh' | शिवसेनेची ‘रॉकेट’भरारी, मनसेला आपटीबार तर भाजपाही घायाळ; सहा नगरसेवक ‘शिवबंधनात’

शिवसेनेची ‘रॉकेट’भरारी, मनसेला आपटीबार तर भाजपाही घायाळ; सहा नगरसेवक ‘शिवबंधनात’

Next

शेफाली परब 
मुंबई : ‘मुंबई महापालिकेत लवकरच आमचा महापौर बसवू’ अशी बतावणी करणाºया भाजपाला शिवसेनेने शुक्रवारी जोरदार धक्का दिला. महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या सातपैकी सहा नगरसेवकांना शिवसेनेत घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार षटकारच लगावला. त्यामुळे महापालिकेतील शिवसेनेचे संख्याबळही अधिक मजबूत झाले. शिवसेनेच्या या आकस्मिक खेळीने एकाच वेळी भाजपा आणि मनसेला चीतपट केले.
मनसेच्या सहा नगरसेवकांना फोडून शिवसेनेने भाजपाच्या स्वप्नाला दुसºयांदा सुरुंग लावला. प्रभाग क्रमांक १६६ चे संजय तुर्डे वगळता मनसेच्या सर्व सहा नगरसेवकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. तसे पत्र शिवसेनेच्या नेत्यांनी आज सकाळी कोकण विभागीय आयुक्तांना सादर केले. त्यानंतर हे नगरसेवक शिवसेनेत सामील झाल्याचे पत्र पालिका आयुक्त अजय मेहता यांना संध्याकाळी सादर करण्यात आले. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ (८५ अधिक ६) ९१ वर पोहोचले आहे. याशिवाय शिवसेनेला तीन अपक्षांचे समर्थन आहे.
सत्तेच्या दिशेने भाजपा एक-एक पाऊल टाकत असताना शिवसेनेने षटकार लगावला. शिवसेनेच्या या खेळीची कुणकुण लागल्याने भाजपाने विभागीय कोकण आयुक्तांच्या कार्यालयातील नोंदणी अधिकाºयालाच मंत्रालयातून बोलावणे धाडले. नोंदणीला विलंब करण्यासाठी हा प्रकार घडल्याचे समजते. मात्र शिवसेनेनेही नोंदणीसाठी आधीच जोरदार फिल्डिंग लावल्याने भाजपाचा प्रयत्न फसला.
एका दगडात
दोन पक्षी
जवळपास समान संख्याबळामुळे शिवसेनेसाठी भाजपा डोकेदुखी ठरत होती. विरोधी पक्षाचे नगरसेवक भविष्यात भाजपाच्या गळाला लागल्यास शिवसेनेच्या सत्तेला धोका निर्माण झाला असता. भांडुपच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या विजयाने हा धोका शिवसेनेला जाणवत होता. अन्य पक्षाचे नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न पूर्वीपासूनच शिवसेनेने सुरू ठेवले होते. अखेर त्यास यश आल्याने शिवसेनेने एका दगडात दोन पक्षी मारल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटत आहे.
अस्वस्थ ‘मनसे’ला चाहूल लागलेली...
२०१२ च्या पालिका निवडणुकीत मनसेचे २७ नगरसेवक निवडून आले होते. मात्र पाच वर्षांत या नगरसेवकांमध्ये असंतोष व अस्वस्थता दिसून आली. काही नगरसेवकांनी २०१७ च्या निवडणुकीपूर्वीच भाजपात प्रवेश केला, तर काही शिवसेनेच्या वाटेवर होते. निवडून आलेले सात जण केवळ नावाने मनसेचे होते.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आयुक्त अजय मेहता यांची भेट घेण्यासाठी बुधवारी महापालिका मुख्यालयात आले होते. त्या वेळेस हे नगरसेवक गैरहजर होते.
इतिहासाची पुनरावृत्ती
१९९५ मध्ये काँग्रेसची सत्ता असताना
महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने
काँग्रेसचे नगरसेवक फोडून आपलाच महापौर निवडून आणला होता.
एवढ्या मोठ्या प्रमाणात पक्ष फुटण्याची ही दुसरी घटना आहे. मनसेतून थेट शिवसेनेत प्रवेश केल्यास हे नगरसेवक बाद ठरले असते. त्यामुळे आधी वेगळा गट स्थापन करून त्यानंतर या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
३ कोटी दिले, सोमय्यांचा आरोप
मनसेच्या नगरसेवकांना सेनेने तीन कोटी रुपये दिल्याचा आरोप खा. किरीट सोमय्या यांनी केला आहे. कोकण विभागीय आयुक्त, लाचलुचपत विभाग व पोलिसांना पत्र पाठवून या नगरसेवकांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
पालिकेत संख्याबळ
सेनेचे ८४ नगरसेवक निवडून आले आहेत. एका अपक्षाचे पद रद्द ठरल्याने दुसºया क्रमांकाचा सेनेचा उमेदवार नगरसेवक म्हणून जाहीर होणार असल्याने सेनेची संख्या ८५ होईल.
मनसेच्या सहा नगरसेवकांनी प्रवेश केल्यामुळे ही संख्या ९१ झाली आहे.
भाजपाकडे ८२ नगरसेवक असून दोन अपक्ष नगरसेवकांचे समर्थन आहे.
राज-उद्धव यांची खेळी
मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेत पाठवून राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंनी भाजपावर कुरघोडी केल्याची चर्चा आहे.
रेल्वे स्थानकांवरील फेरीवाल्यांवरून राज यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि रेल्वे प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते.
भाजपाने आपला महापौर बसविण्याच्या हालचाली सुरू करताच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याची चर्चा आहे.

Web Title: Shiv Sena's Rocket Bharari, MNS to Oppati and BJP also injured; Six corporators 'Shivbandh'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.