लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आजही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तेजस्वी, ओजस्वी आणि ज्वालाग्राही विचार आणि त्यांचा करिश्मा कायम आहे. त्यामुळे कुणी कितीही आटापिटा केला तरी आगामी पालिका निवडणुकीत मुंबईवर शिवसेनेचा भगवा पुनश्च फडकल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत मुंबई म्हाडाचे माजी सभापती व शिवसेनेचे उपनेते विश्वनाथ नेरूरकर यांनी आत्मविश्वास व्यक्त केला.
शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हर्षकुमार जनार्दन ऊर्फ राजाभाऊ खोपकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त शिवसेना शाखाप्रमुख अशोक परब यांनी अभीष्टचिंतनाचा छोटेखानी सोहळा बोरीवली पूर्व येथील शिवसेवा सामाजिक शिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित केला होता. त्यावेळी राजाभाऊ खोपकर यांचे गेल्या पन्नासहून अधिक वर्षांपासून मित्र व हितचिंतक असलेल्या जुन्या शिवसैनिकांनी उपस्थित राहून राजाभाऊंचे अभीष्टचिंतन केले.
विश्वनाथ नेरूरकर यांनी याप्रसंगी २०२२ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. मधल्या काळात वेगळ्या पक्षाचे उमेदवार निवडून आले असतील तरी यापुढे शिवसेनेचा भगवा झेंडा पुनश्च दिमाखाने फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास नेरूरकर यांनी व्यक्त केला.