मुंबई: राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची भूमिका महत्वाची ठरली. त्याचप्रमाणे गेल्या अनेक दिवसांपासून संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपले मत व्यक्त करण्यासोबतच विरोधकांवर देखील निशाणा साधत आहे. त्यातच आज पुन्हा एकदा ट्विटरच्या माध्यमातून संजय राऊत यांनी भाजपावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, तूफान में कश्तियां और घमण्ड में हस्तियां अक्सर डूब जाती हैं असं म्हणत भाजपावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
संजय राऊत यांनी याआधी देखील सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन भाजपावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. सभी का खून है शामिल यहाँ की मिट्टी में. किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है, या राहत इंदोरी यांच्या ओळी संजय राऊत यांनी ट्विट केल्या होत्या. सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशातलं वातावरण तापलं असताना राऊत यांनी हे ट्विट केलं होतं.
दरम्यान राज्यात महाविकासआघाडीचा मंत्रीमंडळ विस्तार आणि शपथविधी लवकरच होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी 13 मंत्री शपथ घेणार असून काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सहा मंत्र्यांनी २८ नोव्हेंबर रोजी शपथ घेतली. तेव्हापासून मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची यादी तयार आहे. मात्र, काँग्रेसच्या यादीचा घोळ अजून संपलेला नाही. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी संभाव्य नावांवर चर्चा केली असली तरी पक्षश्रेष्ठींनी अद्याप त्यास मंजुरी दिलेली नाही.