शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याला पालकमंत्र्यांचे ‘चलेजाव’
By Admin | Published: April 8, 2015 12:34 AM2015-04-08T00:34:22+5:302015-04-08T00:34:22+5:30
शिवसेना - भाजप युतीमुळे शिवसेनेत बंडाळी माजली आहे. यात अनेक निष्ठावंत शिवसैनिकांना उमेदवारी गमावावी लागली आहे. स्थानिक नेतृत्वाच्या विरोधात
कमलाकर कांबळे, नवी मुंबई
शिवसेना - भाजप युतीमुळे शिवसेनेत बंडाळी माजली आहे. यात अनेक निष्ठावंत शिवसैनिकांना उमेदवारी गमावावी लागली आहे. स्थानिक नेतृत्वाच्या विरोधात राज्यातील पंचायत समित्यांत शिवसेनेचे खाते उघडणारे सदस्य आणि माजी शहरप्रमुख हरिभाऊ म्हात्रे यांनीही बंडाचे निशाण फडकावून मंगळवारी प्रभाग-५० मधून अपक्ष अर्ज भरला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना भेटण्यास नकार देऊन कार्यालयाबाहेर काढल्याचे वृत्त आहे.
म्हात्रे यांची सून रोहिणी म्हात्रे व त्यांनी अनुक्रमे महिला उपशहर संघटक व उपजिल्हाप्रमुख पदाचे राजीनामे मातोश्रीवर पाठवून दिले आहेत. स्थानिक नेतृत्वाला नको असतानाही वरिष्ठ स्तरावरून शिवसेना आणि भाजप युतीचा सोपस्कार पूर्ण करण्यात आला. त्यानुसार रविवारी झालेल्या अंतिम बैठकीत शिवसेनेला ६८ तर भाजपला ४३ जागा सोडण्याबाबतच्या अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. विशेष म्हणजे युतीची चर्चा होण्याअगोदर शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार राजन विचारे आदींनी प्रत्येक प्रभागातून इच्छुकांना उमेदवारीबाबत आश्वासने देऊन कामाला लागण्याचे आदेश दिले होते.त्यासाठी आतापर्यंत चार-पाच लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र युतीचा अंतिम निर्णय झाल्यानंतर यापैकी बहुतेकांचे प्रभाग भाजपच्या वाट्याला गेले. तर शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या अनेक प्रभागांतून उपऱ्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
संतप्त शिवसैनिकांनी रविवारी रात्री वाशीतील मध्यवर्ती कार्यालयावर हल्लाबोल केला. विजय नाहटा यांच्यासह पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणा दिल्या. पक्षातील बुजुर्ग या नात्याने माजी शहरप्रमुख हरिभाऊ म्हात्रे यांनी संतप्त शिवसैनिकांची समजूत काढून रात्री उशिरा थेट पालकमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातील कार्यालयात धडक मारली. मात्र तेथे त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी पालकमंत्र्यांनी त्यांनाच अपमानित करून कार्यालयाबाहेर काढल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.