Join us

विकास निधीच्या वाटपात शिवसेनेचा भाजपला ठेंगा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 2:16 AM

विकासकामांसाठी निधीचे वाटप करताना ७२८ कोटींपैकी ५३५ कोटी निधी शिवसेनेने आपल्यासाठी राखून ठेवल्याचा आरोप करीत भाजप नगरसेवकांनी निषेध व्यक्त केला आहे.

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाच महिन्यांच्या ब्रेकनंतर गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आलेली महापालिकेची पहिलीच महासभा वादळी ठरली. या महासभेत सन २०२० - २०२१ चा अर्थसंकल्प कोणत्याही चर्चेविना सदस्यांच्या आॅनलाइन गोंधळातच मंजूर करण्यात आला. मात्र विकासकामांसाठी निधीचे वाटप करताना ७२८ कोटींपैकी ५३५ कोटी निधी शिवसेनेने आपल्यासाठी राखून ठेवल्याचा आरोप करीत भाजप नगरसेवकांनी निषेध व्यक्त केला आहे.महापालिकेचा ३३ हजार ४४१ कोटींचा अर्थसंकल्प असून त्यापैकी उत्पन्नाच्या बाजूला मार्च महिन्यात मंजुरी प्राप्त झाली होती. कोरोनाच्या काळात महापालिका सभा होऊ न शकल्याने खर्चाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी प्राप्त झाली नव्हती. राज्य सरकारने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महापालिका सभा घेण्याची मंजुरी दिल्यानंतर गुरुवारी दुपारी महापालिका सभा पार पडली. या सभेत १८५ नगरसेवक, अधिकारी, पत्रकार व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. आरोग्य खात्याच्या अर्थसंकल्पामध्ये कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. मात्र महापालिकेच्या उत्पन्नात मोठी घट झाल्यामुळे अर्थसंकल्पात अडीच हजार कोटींची कपात करण्यात आली आहे.गेल्या पाच महिन्यांत नगरसेवक निधी आणि विकास निधी मंजूर न झाल्यामुळे विभागातील नागरी सुविधांची कामे खोळंबली आहेत. कोरोनाच्या संकटामुळे तब्बल सहा महिने वाया गेल्यामुळे उर्वरित चार-पाच महिन्यांमध्ये विकासकामे झपाट्याने करण्यासाठी या निधीची वाट नगरसेवक पाहत आहेत. त्यानुसार गुरुवारी झालेल्या महासभेत आपल्या वाट्याला किती निधी येईल याकडे सर्व नगरसेवकांचे लक्ष लागले होते. मात्र ७२८ कोटींच्या निधीपैकी ५३५ कोटी रुपये शिवसेनेने आपल्या नगरसेवकांसाठी राखून ठेवले आहेत.>महापौरांनी पक्षपात केलानिधी वाटपात महापौर पेडणेकर यांनी पक्षपात केला असल्याचा आरोप भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. विकास निधीपैकी ७३ टक्के निधी शिवसेनेला मिळणार आहे. शिवसेनेपाठोपाठ भाजपचे सर्वाधिक ८४ नगरसेवक आहेत. मात्र त्यांना फक्त १३ टक्केच निधी आणि काँग्रेस, राष्ट्रवादी व समाजवादी अशा तीन पक्षांना मिळून १७ टक्के निधीचे वाटप झाले आहे. भाजप नगरसेवकांच्या विकासकामांना कात्री लावण्यात आली असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.या विकासकामांमध्ये कपात... : पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडसाठी दोन हजार कोटींची तरतूद होती. त्यात पाचशे कोटी रुपये आणि बेस्ट अनुदानात पाचशे कोटींची कपात केली आहे. अर्थसंकल्पात विकासकामासाठी १४ हजार ६४७ कोटी ७६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र लॉकडाऊनमुळे पालिकेच्या अपेक्षित उत्पन्नात चार हजार कोटी रुपयांची तूट आहे. त्यामुळे महासभेत गुरुवारी अर्थसंकल्प मंजूर करताना अडीच हजार कोटींची कपात करण्यात आली आहे.