Join us  

शिवसेनेच्या तृष्णा विश्वासराव यांना जीवदान

By admin | Published: March 29, 2017 6:12 AM

निवडणुकीत पराभूत झालेल्या शिवसेनेच्या माजी सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांना नामनिर्देशित नगरसेवक पद देऊन महापालिकेत पुन्हा प्रवेश देण्यात आला आहे

मुंबई : निवडणुकीत पराभूत झालेल्या शिवसेनेच्या माजी सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांना नामनिर्देशित नगरसेवक पद देऊन महापालिकेत पुन्हा प्रवेश देण्यात आला आहे. नामनिर्देशित नगरसेवकांसाठी राखीव पाच पदांकरिता नावे महापालिकेत जाहीर करण्यात आली. यात तृष्णा विश्वासराव यांनाही लॉटरी लागली आहे. महापालिकेत नामनिर्देशित नगरसेवकांसाठी पाच पदे राखीव आहेत. या पदांवर विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ अथवा अभ्यासकांना नेमणे अपेक्षित असते. मात्र पराभूत नेत्यांचे पुनर्वसन अथवा आपल्या मर्जीतील कार्यकर्त्याची वर्णी या पदावर लावण्याची प्रथा गेल्या काही वर्षांमध्ये पडली आहे. त्यामुळे या वर्षीही राजकीय पक्ष आपल्या पराभूत दिग्गज नगरसेवकांना पुन्हा संधी देणार अशी चर्चा होती. संख्याबळानुसार शिवसेना आणि भाजपाला प्रत्येकी दोन तर काँग्रेसला एका नामनिर्देशित नगरसेवकासाठी राखीव जागा मिळणार आहे. शिवसेनेतून माजी सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव आणि काँग्रेस नेते नारायण राणे यांचा पराभव होईपर्यंत अनवाणी चाललेले अरविंद भोसले यांना नगरसेवकपदाचे बक्षीस देण्यात आले आहे. भाजपाने गणेश खाणकर आणि श्रीनिवास त्रिपाठी यांची नावे जाहीर केली आहेत. तर काँग्रेसकडून सुनील नरसाळे यांचे नाव जाहीर झाले आहे. (प्रतिनिधी)