मुंबई : बाबरी मशीद पडल्यानंतर देशात शिवसेनेची लाट होती. तेव्हाच आपण सीमोल्लंघन केले असते, तर आज दिल्लीत पंतप्रधानपद शिवसेनेकडे असते, असे सांगत दिल्ली काबीज करण्याचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आली आहे, असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी व्यक्त केला. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त त्यांनी शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधला.
यापुढे महाराष्ट्रासोबतच इतर राज्यातील निवडणुका लढवायच्या आणि जिंकायच्या. कारण हाती बळ असेल तरच एकहाती सत्ता स्थापन करता येईल, असे सांगत ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील पक्षांनाही अप्रत्यक्ष इशारा दिला.
वेगवेगळ्या लाटा येतात. सध्या कोरोनाच्या लाटांमागून लाटा येत आहेत तर मग शिवसेनेची लाट का येऊ शकत नाही? २५ वर्षे युतीत सडल्यानंतर आम्ही भाजपला सोडले, हिंदुत्वाला नाही. भाजपचे हिंदुत्व पोकळ आहे. त्यांची एका राज्यात एक भूमिका तर दुसऱ्या राज्यात वेगळी भूमिका असते. - उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना
हे नवहिंदुत्ववादी...भाजपला आपण पोसले. पण आपली २५ वर्षे युतीत सडली, या मतावर मी आजही ठाम आहे. भाजपने सत्तेसाठी हिंदुत्वाची कातडी पांघरली आहे. सत्तेसाठी एका राज्यात गोवध बंदी आणि दुसरीकडे नाही, अशी दुटप्पी भूमिका ते घेतात. हिंमत असेल तर देशभर एकच धोरण घेऊन पुढे चला, असे आव्हानही ठाकरे यांनी दिले. अमित शहा म्हणाले की हिंमत असेल तर एकट्याने लढा. पण, आव्हान द्यायचे आणि इडीची पीडा लावायची हे शौर्य नाही. वापरायचे व फेकून द्यायचे ही भाजपची नीती आहे. भाजपने विश्वासघात केल्याच्या आरोपाचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
महाराष्ट्र पिंजून काढणारn मानेचे दुखणे उद्भवले. शस्त्रक्रिया झाली. दोन महिने उपचारात गेले. पण लवकरच बाहेर पडणार आणि महाराष्ट्र पिंजून काढणार. n काळजीवाहू विरोधकांना भगव्याचे तेज दाखवून देणार आहे. विरोधकांची चिंता नाही, हे विरोधक काळजीनेच संपणार आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.