महापालिका पोटनिवडणुकीतून शिवसेनेची माघार, विनोद तावडेंनी मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरेंची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 02:38 AM2017-11-15T02:38:47+5:302017-11-15T02:46:28+5:30
भाजपा नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनामुळे चारकोप येथील प्रभाग क्रमांक २१ ची जागा रिक्त झाली आहे. या प्रभागात १३ डिसेंबर रोजी पोटनिवडणूक होत आहे.
मुंबई : भाजपा नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनामुळे चारकोप येथील प्रभाग क्रमांक २१ ची जागा रिक्त झाली आहे. या प्रभागात १३ डिसेंबर रोजी पोटनिवडणूक होत आहे. शैलजा गिरकर यांच्या सुनेला भाजपाने या प्रभागात उमेदवारी दिली आहे. गिरकर कुटुंबाशी जुने संबंध असल्याने शिवसेनेने या प्रभागात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. मात्र ही जागा भाजपाची असल्यानेच शिवसेनेने माघार घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
शैलजा गिरकर यांच्या जागी त्यांची सून प्रतिभा गिरकर यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. या पोटनिवडणुकीत शिवसेनेने भाजपाला पाठिंबा द्यावा म्हणून भाजपा आमदार भाई गिरकर आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
त्यानुसार शिवसेनेनेही या पोटनिवडणुकीत उमेदवार देणार नाही, अशी भूमिका घेतल्याचे समजते. भाजपा नेत्यांनीच याची माहिती सोशल मीडियावरून दिली आहे.
कांदिवली चारकोप या प्रभागात भाजपाच्या गिरकर कुटुंबाचा जोर आहे. शैलजा गिरकर १९९७ पासून या प्रभागातून निवडून येत होत्या. २०१७ च्या पालिका निवडणुकीत विभाग फेररचनेनंतरही गिरकर मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. मात्र काही महिन्यांपूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यामुळे या प्रभागात पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. या पोटनिवडणुकीत शिवसेनेने भाजपाला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.