लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीवर यंदा कोरोनाचे सावट होते. मात्र तरीदेखील मुंबईत शिवप्रेमींनी शिवजयंती उत्साहात साजरी केली. शहरातील चौकाचौकांमध्ये विविध प्रकारची सजावट करण्यात आली होती. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी शिवप्रेमी पारंपरिक वेष परिधान करून शिवजयंती उत्सवामध्ये सामील झाले होते. या वेळी अनेक परिसरात भगव्या पताका लावून विद्युत रोषणाई करण्यात आली होती. काही मंडळांच्या वतीने पोवाडे व मर्दानी खेळदेखील सादर करण्यात आले.
यंदा शिवजयंतीवर कोरोनाचे सावट असल्याने प्रशासनातर्फे शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. शिवभक्तांनी दरवर्षीच्या तुलनेत साध्या स्वरूपात शिवजयंती साजरी केली.
मुंबईचे प्रवेशद्वार समजला जाणारा चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने न्हाऊन निघाला होता. चेंबूर येथील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याभोवती मोठ्या प्रमाणात आकर्षक सजावट करण्यात आली होती. या पुतळ्याला दिवसभर विविध सामाजिक संघटना, शिवप्रेमी तसेच सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी भेट देऊन पुष्पवृष्टी केली.
मुंबईत अनेक ठिकाणी शिवजयंतीनिमित्त कोरोना योद्ध्यांचा सन्मान तसेच आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळदेखील अनेक शिवप्रेमींनी हजेरी लावली. या वेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ तसेच ‘जय भवानी जय शिवाजी’ या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. या पुतळ्याजवळ काही शिवभक्तांनी दौड करत मशालदेखील आणली होती.
जुहू बीच येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शुक्रवारी सकाळी माजी आमदार कृष्णा हेगडे आणि अभिनेता दलिप ताहिल यांनी आदरांजली वाहिली. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती, जुहू यांच्या वतीनेदेखील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी समितीचे अध्यक्ष अरविंद, प्रमुख सचिव डॉक्टर मोहन राणे व इतर मान्यवर उपस्थित होते.