गृहविलगीकरणातील रुग्णांच्या योग्य उपचाराचे शिवधनुष्य डॉक्टरांनी उचलावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:05 AM2021-05-17T04:05:57+5:302021-05-17T04:05:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या फॅमिली डॉक्टरांनी सरकारसोबत कोरोना विरोधातील लढाईत उतरावे. विशेषतः घरीच राहून उपचार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या फॅमिली डॉक्टरांनी सरकारसोबत कोरोना विरोधातील लढाईत उतरावे. विशेषतः घरीच राहून उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांच्या योग्य उपचाराचे शिवधनुष्य सर्व माझा डॉक्टरांनी उचलावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. ते ‘प्राथमिक आरोग्य केंद्रातून कोरोनावर उपचार’ या वनएमडी संस्थेने आयोजित केलेल्या ऑनलाइन परिषदेत बोलत होते.
कोरोनाविरोधातील लढ्यात राज्यातील सर्व डाॅक्टरांना सहभागी करून घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील ‘माझा डाॅक्टर’ उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. अगदी गावपातळी पर्यंतच्या तब्बल १७,५०० डाॅक्टरांसोबत रविवारी राज्याच्या टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टरांनी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या या ऑनलाइन परिषदेत कोविडवरील वैद्यकीय उपचारांबाबत चर्चा झाली.
प्रत्येकाचा एका फॅमिली डाॅक्टर असतो. त्यांच्यावर रुग्णाचा सर्वाधिक विश्वास असतो. या डॉक्टरांनाही त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रकृतीची माहिती असते. कोरोना लढ्यात फॅमिली डाॅक्टर म्हणून आपल्या सहकार्याची गरज आहे. ७५ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नसल्याने ते घरीच विलगीकरणात उपचार घेत असतात. काहींना तर औषधांचीही गरज पडत नाही पण काही रुग्ण हे काही कालावधीनंतर गंभीर होतात आणि उशिरा दवाखान्यात दाखल होतात. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढताना दिसते. त्यामुळे गृहविलगीकरणातील रुग्णांवर उपचार करणाऱ्या सर्व माझा डॉक्टरांची जबाबदारी आणि भूमिका अधिक महत्त्वाची ठरत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. गृहविलगीकरणातील रुग्णांचे उत्तम व्यवस्थापन झाल्यास आपण मृत्यू दरही कमी करू शकू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
कोविड रुग्णालयातही सेवा द्या
मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित डॉक्टरांना ‘माझा डॉक्टर’ सेवेचा विस्तार करण्याची विनंती केली. ‘माझा डॉक्टरांनी’ त्यांना शक्य असेल तिथे त्यांच्या जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये, रुग्णालयात दिवसाला एकदा तरी जाऊन सेवा द्यावी. त्यामुळे शासनाला सहकार्य तर मिळेलच परंतु आपल्या भागातील डॉक्टर आपल्याला येऊन पाहून गेल्याचा आनंदही रुग्णांना होईल.
पावसाळ्यात अँटिजन टेस्ट वाढविण्याच्या सूचना
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या सर्दी, ताप, खोकला पडसे यासारख्या आजारांबरोबर मलेरिया, डेंग्यू, लेप्टो सारख्या आजारांना रोखण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. त्यात माझा डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या सर्व डॉक्टरांची जबाबदारी फार मोठी आहे. पावसाळ्यात रॅपिड अँटिजन टेस्ट मोठ्या प्रमाणात करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
प्रतिक्रियांचा पाऊस
दोन तासांच्या या परिषदेत टास्क फोर्सच्या तज्ज्ञ डाॅक्टरांनी मार्गदर्शन केले आणि सहभागी डाॅक्टरांच्या शंकांचे समाधान केले. या आगळ्यावेगळ्या परिषदेच्या आयोजनाबद्दल अनेक डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले व धन्यवाद दिले. या परिषदेत सुमारे ३ हजारावर प्रतिक्रिया व सूचना प्राप्त झाल्या तर हजार एक लोकांनी हा कार्यक्रम शेअर केला. अशा स्वरूपाचे कार्यक्रम कोविड काळात कायम आयोजित करावेत जेणे करून मार्गदर्शन मिळत राहील असेही अनेकांनी म्हटले आहे.
बालरोग तज्ज्ञांचे टास्क फोर्सही करणार मार्गदर्शन
तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन केला आहे. आजच्याप्रमाणे येत्या काही दिवसात राज्यभरातील बालरोग तज्ज्ञांना या टास्क फोर्सचे तज्ज्ञ मार्गदर्शन करतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. डॉक्टरांच्या अडचणींची जाणीव असून त्या प्राधान्याने सोडवल्या जातील असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी डॉक्टरांना दिला. सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे आज बंद आहेत. मग आपल्याला देव कुठे दिसतो तर तो तुमच्या रुपात दिसतो असे सांगून मुख्यमंत्र्यांनी तुम्हा देवदूतांच्या मदतीने आपण कोविडविरुद्धची ही लढाई नक्की जिंकू असा विश्वासही व्यक्त केला.
टास्क फोर्स डॉक्टर्सचे मार्गदर्शन
कोरोना उपचारात सहा मिनिटांचा वॉक, पेशंटची ऑक्सिजनची स्थिती, त्याची गरज, बुरशीमुळे होणाऱ्या म्युकर मायकोसिस आजारावरील उपचार, रेमडेसिविरचा वापर, व्हेंटिलेटरवरील रुग्णांची घ्यावयाची काळजी, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी करायच्या उपाययोजना, पोस्ट कोविड रुग्णांची घ्यावयाची काळजी, सिटी स्कॅनचा वापर अशा विविध विषयांवर डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. आशिष भुमकर आदी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.