‘शिवडी-न्हावाशेवा’चे १२ जानेवारीला लोकार्पण? PM मोदींची वेळ मिळवायचा राज्य सरकारचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2023 06:00 AM2023-12-28T06:00:58+5:302023-12-28T06:01:35+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंतप्रधानांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मनोज मोघे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई ( Marathi News ): राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-न्हावाशेवा सागरी सेतू (एमटीएचएल) प्रकल्पाचे काम ९९ टक्के पूर्ण झाले आहे. सुमारे २२.७६ किमी लांबीच्या या सागरीसेतूचे लोकर्पण १२ जानेवारीला करण्याचा प्रयत्न आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्याची वेळ साधण्याचा सरकारचा प्रयत्न असून तसे झाल्यास त्याच दिवशी या प्रकल्पाचे लोकार्पण होईल. मुंबई ते अलिबागचे अंतर अवघ्या अर्ध्या तासावर आणणारा हा प्रकल्प त्यानंतर मुंबईकरांसाठी खुला होईल.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एमटीएचएल, मुंबईचा कोस्टल रोड हे प्रकल्प सुरू होणे महायुती सरकारसाठी महत्त्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी १२ जानेवारीला नाशिकला येणार आहेत. हीच वेळ साधून एमटीएचएलचेही उद्घाटन करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंतप्रधानांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
टोल कमी करण्याचा प्रस्ताव
२२ किमीच्या या महामार्गावर ५०० रुपयांपर्यंत टोल लागण्याची शक्यता आहे. हा टोल कमी करावा, अशी मागणी होत आहे. त्याचाही विचार सरकारकडून सुरू आहे.
पाच महिने उशिराने
सप्टेंबरअखेरीस या सागरी सेतूचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. नंतर डिसेंबरची डेडलाइन देण्यात आली. २५ डिसेंबरला अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त उद्घाटन होणार होते. मात्र, ते होऊ शकले नाही. आता ९९ टक्के काम पूर्ण झाले असून जानेवारीतच प्रकल्पाचे उद्घाटन व्हावे, असा सरकारचा प्रयत्न आहे.