मुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शनिवारी (९ मार्च) सायंकाळी ५ ते ९ या दरम्यान शिवसेना महिला सेनेच्या वतीने शिवदुर्गा महिला संमेलनाचे आयोजन षण्मुखानंद सभागृह, सायन येथे करण्यात आले आहे. या संमेलनाला शिवसेना महिला पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे संमेलनाचे संयोजन विधान परिषद उपसभापती व शिवसेना महिला नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
या संमेलनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे डॉ. अमोल शिंदे, गजानन पाटील या कार्यक्रमाचे समन्वय करतील. तसेच, या कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये शिवसेनेचे सर्व नेते आणि उपनेते आणि मुंबईच्या महिला विभाग प्रमुख, महिला संपर्कप्रमुख, महिला उपविभाग प्रमुख, विधानसभा संपर्कप्रमुख तसेच शिवसेनेच्या पदाधिकारी यांचा चांगल्या प्रकारचा महत्त्वाचा सहभाग आहे.
महिला मतदारांना लागणाऱ्या नागरी सुविधा, आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण, महिलांची सुरक्षितता यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांची माहिती देणे हा या संमेलनाचा हेतू आहे. महिलांसाठी अनेक निर्णय राज्य सरकारने घेतले असून चौथ्या महिला धोरणाला सुद्धा वेग देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर या सगळ्या योजना सामान्य महिलांपर्यंत पोहोचवणे, हे या संमेलनाचा एक मुख्य हेतू असल्याचे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
याचबरोबर, महिला कार्यकर्त्यांनी केलेल्या कामातील तसेच महिला लोकप्रतिनिधींच्या कामातील यशोगाथा संमेलनात मांडल्या जातील. त्यासोबत शिवसेना महिला सेनेचे कार्य आणि त्याला सामोरे जात असताना प्रयत्नांची दिशा यावरही चर्चा होईल. तसेच, सरकारच्या योजना किंवा विकासाच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी ठिकठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत आपण कसं पोहोचायचं याबद्दल देखील अनुभवी महिला अधिकारी महिलांना मार्गदर्शन करणार आहेत, असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.