एसटीच्या शिवाई बसला मुहूर्त मिळेना; निविदा प्रक्रियेत अडकली गाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 01:38 AM2021-03-23T01:38:18+5:302021-03-23T01:38:36+5:30
मुंबई ते पुणे मार्गावर या इलेक्ट्रिक बस प्रायाेगिक तत्त्वावर धावणार आहेत. एसटीसमोर ग्रामीण भागांतील विजेचा प्रश्न पाहता तेथे चार्जिंग स्टेशन बसवण्याची समस्या आहे
मुंबई : एसटी महामंडळाने दीड वर्षापूर्वी १५० इलेक्ट्रिक बस घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आजही या इलेक्ट्रिक शिवाई बस निविदा प्रक्रियेमध्ये अडकल्या आहेत.
मुंबई ते पुणे मार्गावर या इलेक्ट्रिक बस प्रायाेगिक तत्त्वावर धावणार आहेत. एसटीसमोर ग्रामीण भागांतील विजेचा प्रश्न पाहता तेथे चार्जिंग स्टेशन बसवण्याची समस्या आहे. त्यामुळे थेट लांब पल्ल्याच्या मार्गावर इलेक्ट्रिक बस चालवण्याऐवजी मुंबई ते पुणे या कमी अंतरावर बस चालविण्याचा प्रयत्न महामंडळाचा आहे. सध्या मुंबई-पुणे प्रवासासाठी ३ तास २० मिनिटांचा कालावधी लागतो. या नव्या बसमध्येच ई-टॉलयेट आणि पॅण्ट्री कार असणार आहे. केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक गाड्यांना प्राधान्य दिले जात आहे. त्यानुसार एसटी महामंडळाने इलेक्ट्रिक बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
महामंडळाले एसी इलेक्ट्रिक बसकरिता जुलै २०१९ मध्ये निविदा काढली. त्यानुसार एका निविदाकाराने ५० बस पुरविण्यासाठी उत्सुकता दाखवत निविदेतील काही अटी व शर्ती बदलण्याची मागणी केली. परंतु महामंडळाने त्यास नकार दिला. परिणामी पहिल्या टप्प्यातील ५० इलेक्ट्रिक बस रखडल्या. तर उरलेल्या १०० बसकरिता येत्या दाेन महिन्यांत निविदा काढण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढील सात ते आठ महिन्यात टप्प्यटप्प्याने या बस महामंडळाच्या ताफ्यात येणार आहेत.
इंधन खर्चात हाेणार बचत
एसटीला एका बसकरिता इंधनाच्या प्रति किलोमीटर मागे १ रुपये २० पैसे खर्च येत आहे. तर इलेक्ट्रिक बसमागे ६४ पैसे प्रतिकिमी खर्च येतो. परिणामी एसटीचा खर्च कमी हाेणार आहे.