Join us

शिवस्मारक उभारणीचे कंत्राट लार्सन अँण्ड टुब्रोला; पावसाळ्याआधी कामाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2018 7:23 PM

जागतिक किर्तीचे हे स्मारक होणार असून एल अँड टी कंपनीला या कामामुळे वेगळी उंची प्राप्त होणार आहे.

मुंबई: अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे कंत्राट लार्सन अँड टुब्रो कंपनीला देण्यात आले आहे. सरकारकडून मागवण्यात आलेल्या निविदांपैकी लार्सन अँण्ड टुब्रोची निवीदा सगळ्यात कमी रक्कमेची होती. त्यामुळे लार्सन अँण्ड टुब्रोला हे कंत्राट देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज काम सुरू करण्यासंदर्भातील स्वीकृती पत्र कंपनीला देण्यात आले. त्यानुसार पावसाळ्यापूर्वी कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. येत्या 36 महिन्यांत स्मारक उभारणीचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, आजचा दिवस ऐतिहासिक आहे. गेल्या १५ वर्षांपासून शिवस्मारक उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. हे सरकार आल्यानंतर विनायक मेटे यांना स्मारक समितीचे अध्यक्ष करून कामाला गती दिली. राज्य शासनाने अतिशय जलदगतीने काम करत या स्मारकासाठी लागणारे सर्व परवाने आणले आणि आज एल अँड टी या कंपनीला काम सुरू करण्यासंदर्भातील पत्र देण्यात आले. जागतिक किर्तीचे हे स्मारक होणार असून एल अँड टी कंपनीला या कामामुळे वेगळी उंची प्राप्त होणार आहे. कंपनीने पावसाळ्यापूर्वीच स्मारकाचे काम सुरू करावे. तसेच अतिशय वेगाने संपूर्ण स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. कमी कालावधीत जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याचे वैशिष्ट्यपूर्ण कामही कंपनीला करण्यास मिळाले आहे. स्मारकाचे काम सुरू करण्यासाठी व सर्व परवाने मिळविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मेहनत घेतली आहे. स्मारक लवकरात लवकर पूर्ण करून भारत अत्युच्च दर्जाचे काम करू शकतो हे जगाला दाखवून द्यावे, असे फडणवीस यांनी सांगितले. 

 

टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराजमुंबई