Join us

शिवाजी महाराजांसह रामदास स्वामी बाप्पाला देणार निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 2:23 AM

नाचत-गाजत आलेल्या गणपती बाप्पाला थाटामाटात निरोप देण्यासाठी मुंबापुरीत छत्रपती शिवाजी महाराजांसह रामदास स्वामी, कासव आणि उंदीर मामाही सज्ज झाले आहेत.

- चेतन ननावरे मुंबई : नाचत-गाजत आलेल्या गणपती बाप्पाला थाटामाटात निरोप देण्यासाठी मुंबापुरीत छत्रपती शिवाजी महाराजांसह रामदास स्वामी, कासव आणि उंदीर मामाही सज्ज झाले आहेत. वेगवेगळ्या कलाकृतींद्वारे बाप्पाच्या निरोप समारंभात पुष्पवर्षाव करण्यासाठी काळाचौकी, लालबागमधील उत्सव मंडळे प्रसिद्ध आहेत. यंदा येथील श्रॉफ बिल्डिंगने छत्रपती शिवाजी महाराजांसह उभे असलेले रामदास स्वामी, तर मयूरेश उत्सव मंडळाने कासवाच्या पाठीवर भगवा झेंडा हाती घेतलेल्या उंदीर मामाची प्रतिकृती साकारली आहे.याबाबत अधिक माहिती देताना श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी उत्सव मंडळाचे सदस्य मनोज माने म्हणाले की, गेल्या ४९ वर्षांपासून इमारतीमधील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांचा प्रतिकृती साकारण्यात हातभार लागतो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी लालबागमधून जाणाऱ्या सुमारे ४५० ते ५०० गणेशमूर्तींवर उत्सव मंडळांतर्फे पुष्पवृष्टी केली जाते. त्यासाठी ७०० किलो फुले आणि ५०० किलो गुलाल लागतो. गतवर्षी विठ्ठल व नामदेवाची प्रतिकृती साकारली होती. यंदा छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची प्रतिकृती साकारली आहे.पर्यावरणपूरक अशी प्रतिकृती साकारण्यासाठी बांबूच्या काड्यांचा आणि कागदाचा वापर करण्यात आला आहे.गेल्या महिन्याभरापासून साकारण्यात येणाºया या कलाकृतीचे वजन २०० किलो असल्याची माहिती माने यांनी दिली.>मयूरेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष अनिल चव्हाण म्हणाले की, यंदा उत्सव मंडळाचे २७वे वर्ष आहे. कासवाच्या पाठीवर उंदीर मामा हाती भगवा झेंडा घेऊन पुष्पवृष्टी करणार आहे. या प्रतिकृतीची उंची १२ फूट आहे. गेल्या १५ दिवसांपासून प्रतिकृती तयार करण्याचे काम करत आहोत. मंडळाचे ५०हून अधिक सभासद एकत्र येऊन ही प्रतिकृती तयार करतात. दत्ताराम लाड मार्गावरून जाणाºया २० ते २२ फुटांच्या ४० ते ४५ मूर्तींवर पुष्पवृष्टी केली जाते. त्याशिवाय विसर्जनास निघालेल्या गणेश मंडळांना १०० लाडूंचे पॅकेट आणि पाणी वाटप केले जाते. याशिवाय १५ फुटांची शाल गणपतीला अर्पण केली जाते. मंडळाचे सचिव विनायक कदम म्हणाले की, पुष्पवृष्टीमध्ये फुलांमधून गुलालाचा वर्षाव बाप्पावर केला जातो. त्यासाठी यंदा सुमारे ७० किलो गुलाल, ७० किलो गोंडा, ३० ते ४० किलो तेरडा यांचे एकत्रित मिश्रण २५ फुटांवरून केले जाते.

टॅग्स :गणेशोत्सवगणेश चतुर्थी २०१८