मुंबई : भाजपा-शिवसेनेचे फसवे सरकार अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा वापर केवळ स्वतःच्या प्रसिद्धीसाठी करीत असल्याने खुद्द शिवाजी महाराजांनाच या सरकाकडून आपले स्मारक उभारायचे नसावे, अशी संतप्त प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे.
शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी अरबी समुद्रातील नियोजित स्थळी जाणाऱ्या बोटीला अपघात होण्याच्या घटनेसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. हे सरकार सतत शिवाजी महाराजांचे नाव घेऊन महाराष्ट्राची फसवणूक करते आहे. केवळ स्वतःच्या प्रसिद्धीसाठी शिवरायांच्या नावाचा वापर सुरू आहे. अशा दांभिक सरकारकडून आपले स्मारक उभारले जावे, हे कदाचित खुद्द शिवाजी महाराजांनाच रूचले नसावे. त्यामुळेच स्मारकाच्या पायाभरणीसाठी जाणाऱ्या बोटीला अपघात झाला असावा. ही घटना एक सूचक संकेत आहे. हे सरकार अपघाताने सत्तेत आले आणि अपघातानेच जाणार, हे निश्चित असल्याचे विखे पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी जात असलेल्या बोटींच्या ताफ्यातील एका स्पीड बोटीला बुधवारी अपघात झाला. स्पीड बोट खडकावर आदळून बुडाली. या अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. या बोटीवर 25 जण होते. यापैकी 24 जणांना वाचवण्यात यश आले असून सिद्धेश पवार या तरुणाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.