शिवाजी महाराजांनी केला व्यवस्थापन शास्त्रांचा यशस्वी वापर

By admin | Published: March 29, 2016 02:05 AM2016-03-29T02:05:20+5:302016-03-29T02:05:20+5:30

व्यवस्थापन शास्त्रावर अनेक तज्ज्ञ मंडळींनी लिहिलेली पुस्तके उपलब्ध आहेत. मोठमोठे व्यवसाय, उद्योगधंद्यात व्यवस्थापनशास्त्र उपयोगात आणले जात आहे. व्यवस्थापनशास्त्र

Shivaji Maharaj successfully utilized the management of the science | शिवाजी महाराजांनी केला व्यवस्थापन शास्त्रांचा यशस्वी वापर

शिवाजी महाराजांनी केला व्यवस्थापन शास्त्रांचा यशस्वी वापर

Next

मुंबई : व्यवस्थापन शास्त्रावर अनेक तज्ज्ञ मंडळींनी लिहिलेली पुस्तके उपलब्ध आहेत. मोठमोठे व्यवसाय, उद्योगधंद्यात व्यवस्थापनशास्त्र उपयोगात आणले जात आहे. व्यवस्थापनशास्त्र म्हणजे कमीत कमी साधनसामग्रीत अधिकाधिक लाभ मिळविणे. तथापि तीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी याच व्यवस्थापन शास्त्राची प्रभावी अंमलबजावणी करून आपले उद्दिष्ट गाठल्याचे दिसून येते, असे प्रतिपादन व्यवस्थापन तज्ज्ञ आनंद भागवत यांनी केले.
मराठा मंदिराच्या प्रागतिक संघ या विभागाच्या वतीने शिवजयंती उत्सावानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘छत्रपती शिवाजी महाराज एक नवीन विचार’ या विषयावर व्याख्यान देताना आनंद भागवत बोलत होते. हा कार्यक्रम मुंबई सेंट्रल येथील मराठा मंदिरच्या जिवाजीराव महाराज शिंदे सभागृहात पार पडला. या वेळी आनंद भागवत म्हणाले की, माणसाचा सर्वांगीण विकास हा युद्धजन्य स्थितीत होत नसतो तर तो शांततामय काळातच होतो. ११ हजार वर्षांचा इतिहास शिवरायांचा प्रेरणास्थान होता. आपण इतिहासाचा वेध चिकित्सकपणे घेतला पाहिजे. भावनावश होऊन व्यक्तिपूजक होतो. त्यातून महापुरुषांना देवत्व बहाल केले जाते. मग दंतकथा प्रसवतात. दुसऱ्या महायुद्धात वापरलेली रणनीती असो वा २१ व्या शतकात व्यवस्थापनशास्त्राच्या वापरासंबंधी होणारी चर्चा असो, त्याची यशस्वी अंमलबजावणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. आपली व शत्रूची बलस्थाने कोणती, आपल्यातील त्रुटी, उणिवा कोणत्या याचा बारकाईने विचार करून शिवरायांनी शत्रूवर मात करण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या. गनिमी कावा हा त्यातलाच एक प्रकार आहे.
राज्याच्या आवश्यकतेनुसार रयतेकडून योग्य तोच कर आकारला जात असे. मात्र मोठमोठ्या मोहिमांसाठी आणि योजनांसाठी सुरत, औरंगाबाद, गोवा आदी ठिकाणच्या पोर्तुगीज, इंग्रज वखारींवर छापे मारून महाराजांनी मोठी रसद मिळविली. शहाजीराजांची अटक, अफझल खानाचा वध, राजे जयसिंगाबरोबरचा तह, शाहिस्ते खानाची फजिती, औरंगजेबच्या तावडीतून केलेली सुटका या साऱ्या घटनांमध्ये शिवरायांनी कसे नियोजन केले होते याची तपशीलवार माहिती आनंद भागवत यांनी दिली. शेवटी तुमची मुले मातृभक्त होतील हे पाहा म्हणजे ती हुशार होतील, दुर्गुणी होणार नाही, असा सल्ला त्यांनी उपस्थित महिलांना दिला.
बाल शिवशाहीर ऋतुजा घुगे हिने रामायणापासून शिवरायांच्या काळापर्यंतच्या समृद्ध भारताचे आपल्या ओघवत्या भाषणातून दर्शन घडवले. प्रारंभी मराठा मंदिरचे सरचिटणीस शशिकांत पवार, उपाध्यक्ष के.डी. सावंत, प्रागतिक संघाचे कार्याध्यक्ष विनायक घाग, उपकार्याध्यक्ष दिलीप चव्हाण आणि प्रमुख वक्ते आनंद भागवत, बालशिवशाहीर ऋतुजा घुगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रागतिक संघाचे उपकार्याध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Shivaji Maharaj successfully utilized the management of the science

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.