Join us

'शिवाजी महाराजांनी महिलांचं संरक्षण शिकवलं, 'हे' लांडग्यासारखं कंगनाच्या मागे लागलेत' 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2020 5:55 PM

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात एका महिलेवर असा अन्याय योग्य नसून महाराजांनी आम्हाला महिलांचा सन्मान करण्याची शिकवण दिली आहे.

ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात एका महिलेवर असा अन्याय योग्य नसून महाराजांनी आम्हाला महिलांचा सन्मान करण्याची शिकवण दिली आहे.

मुंबई - अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेनेचा वाद चांगलाच रंगला आहे. कंगनाला मुंबईत पाऊल ठेऊन देणार नसल्याचे शिवसेनेनं म्हटलं होत. त्यानंतर, आज कंगना मुंबईत दाखल झाली आहे. तत्पूर्वीच सकाळी कंगनाच्या पाली हिल येथील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर पालिकेनं कारवाई केली. कंगनाच्या कार्यालयावरील कारवाईनंतर भाजपा नेत्यांनी शिवसेनवर टीका केली असून ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात येत असल्यचं म्हटलंय. आता, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही शिवसेनेवर कंगना प्रकरणावरुन टीका केलीय. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात एका महिलेवर असा अन्याय योग्य नसून महाराजांनी आम्हाला महिलांचा सन्मान करण्याची शिकवण दिली आहे. स्वत:ला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणणाऱ्यांना हे शोभत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतून प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे, कुणीही देशात कुठेही जाऊ शकतो, काहीही बोलू शकतो. कंगना काय बोलली याबद्दल मला काही बोलायचं नाही, तिच्या वक्तव्याशी आम्ही सहमतही नाही. पण तिच्या वक्तव्याबद्दल तुम्ही कायदेशीर मार्गाने तिच्यावर कारवाई करा, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. महाराजांनी महिलेला सन्मान देणं शिकवलं, पण हे लांडग्यासारखे कंगनाच्या मागे लागलेत, असे म्हणत पाटील यांनी शिवसेनेवर जबर प्रहार केला. 

मुंबईतील कार्यालयावर होत असलेल्या तोडफोडीच्या कारवाईला सुरुवात होत असताना कंगनानं शिवसेना आणि पालिकेवर टीकेची झोड उठवली. त्यानंतर, मुंबईत दाखल झाल्यानंतर कंगनानं पुन्हा ट्विट करत शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. कंगनानं १२ सेकंदांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. यामध्ये तिच्या पाली हिल येथील कार्यालयात झालेली तोडफोड दिसत आहे. कोसळलेलं छत, मोडलेल्या वस्तू यामध्ये अगदी स्पष्ट दिसत आहेत. 'डेथ ऑफ डेमोक्रसी' अशा तीन शब्दांत कंगनानं तिच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाईवर भाष्य केलं आहे. मुंबईत दाखल झालेली कंगना सध्या तिच्या खार येथील निवासस्थानी आहे.

कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड झाल्यानंतर भाजपा नेते तिच्या समर्थनार्थ उतरले आहेत. भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका करताना, ही कारवाई सूडबुद्धीने होत असल्याचे म्हटले. त्यानंतर, महिला कुस्तीपटू गीता फोगाटनेही ट्विट करुन कंगनाचे समर्थन केले आहे. तसेच, शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे टीक केलीय. ''ऐसा लग रहा जिसकी लाठी उसकी भैंस !! खैर कंगना राणावत का ऑफ़िस तोड सकते है हिम्मत नहीं'', असे ट्विट गीता फोगाटने केले आहे. गीताने यापूर्वीही अनेकदा कंगनाची बाजू घेतली होती, तसेच सुशांत प्रकरणात सीबीआय चौकशीच्या मागणीला समर्थनही दिले होते. 

चंद्रकांत पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केलीय. राज्यात संजय राऊत नावाचं नवं सरकार आलंय. त्याला आवरं घालणं गरजेचं आहे. संजय राऊत यांनी महिलेसाठी हरामखोर शब्द वापरला, त्यानंतर ते या शब्दाचा अर्थ नॉटी असा सांगतात. मग, संजय राऊत इंग्रजी कधीपासून बोलायला लागले, मुंबईत इंग्रजी व हिंदीत दुकानांना पाट्यासुद्धा तुम्ही लावू देत नाहीत, मग आता इंग्रजीत कसे बोलता? असा प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. 

 

टॅग्स :चंद्रकांत पाटीलशिवसेनामुंबईमहाराष्ट्रकंगना राणौत