"शिवाजी महाराजांना माफीवीर म्हटलं, भाजपानं महाराष्ट्राची माफी मागावी नाहीतर..."; संजय राऊत कडाडले!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 10:40 AM2022-11-20T10:40:05+5:302022-11-20T10:40:39+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली असं भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी विधान केलं आहे. या संतापजनक विधानाचं भाजपा समर्थन करतं का?
मुंबई-
छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली असं भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी विधान केलं आहे. या संतापजनक विधानाचं भाजपा समर्थन करतं का? सावरकरांच्या मुद्द्यावरुन राहुल गांधींना जोडे मारण्याची भाषा करता मग आता अशी विधानं करणाऱ्या राज्यपाल आणि प्रवक्त्यांना जोडे मारणार आहात का?, असा सवाल करत खासदार संजय राऊत यांनी भाजपावर कडाडून टीका केली आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
"शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली असं विधान भाजपाच्या प्रवक्त्यांनी केलं. राज्यपालांनी वर्षभरात चारवेळा शिवाजी महाराजांचा अपमान केला. महात्मा फुले आणि सावित्राबाईंबद्दलही वादग्रस्त विधान केलं. यावर शिंदे-फडणवीस सरकार शांत का? ज्या स्वाभीमानाचं तुणतुण वाजवत तुम्ही महाराष्ट्रातील सत्ता फोडली. आता राज्यपालांविरोधात तुमचं तोंड शिवलं गेलं आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांना माफीवीर म्हटलं गेलं तरी तुम्ही सत्तेला चिटकून बसलेले आहात. तुम्हाला याची लाज वाटली पाहिजे. राज्यपालांना हटवण्याची अधिकृत मागणी सरकारकडून केली गेली पाहिजे. नाहीतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा", असं संजय राऊत म्हणाले.
नाहीतर महाराष्ट्र तुम्हाला जोडे मारेल
"छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला गेला तरी तुम्ही शांत का आहात? राहुल गांधींना जोडे मारायला हवेत म्हणून रस्त्यावर उतरलात आता राज्यपालांविरोधात शिंदे गट रस्त्यावर उतरणार आहे का? तुम्ही जर महाराष्ट्राचा आणि छत्रपती शिवरायांचा असा अपमान करणार असाल तर महाराष्ट्र तुम्हाला जोडे मारेल एवढं लक्षात ठेवा. शिवसेना याचा कडाडून निशेष करेल", असं संजय राऊत म्हणाले.
"छत्रपती शिवरायांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली हे तुम्ही कुठून शोधून काढलं. मग देशाचे पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येऊन शिवाजी महाराजांचा जयजयकार का करतात, गृहमंत्री अमित शाह शिवाजी महाराजांचे दाखले का देतात आणि नौदलाच्या ध्वजात शिवाजी महाराजांना स्थान का दिलं जातं? सुधांशू त्रिवेदींचं म्हणणं भाजपाला पटतंय का? हीच भाजपाची अधिकृत भूमिका आहे का?", अशा प्रश्नांची सरबत्ती करत संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.