Join us

शिवाजी मंदिरचा तिढा सुटणार की नाही?

By संजय घावरे | Published: July 01, 2024 8:41 PM

निर्माते आणि नाट्यगृह व्यवस्थापन आपापल्या भूमिकांवर ठाम; तिसऱ्या तिमाहीतील तारखांवरही काही निर्मात्यांचा बहिष्कार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई - श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह आणि काही नाट्य निर्मात्यांमध्ये डिसेंबर २०२३पासून सुरू असलेला वाद अद्याप शमलेला नाही. या वर्षातील तिसऱ्या तिमाहीतील तारखांच्या वाटपातही नाराज नाट्य निर्मात्यांनी सहभाग घेतला नाही. यामुळे पुढील तीन महिने दादरमधील नाट्य रसिकांना काही गाजलेली नाटके पाहण्यासाठी यशवंत नाट्य मंदिर आणि मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाकडे धाव घ्यावी लागणार आहे. 

श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहाचा तिढा सुटणार की नाही? असा प्रश्न सर्वसामान्य नाट्य रसिकांना सतावत आहे. १ जानेवारीपासून प्रशांत दामलेंची गौरी थिएटर, दिलीप जाधव यांची अष्टविनायक, संतोष शिदम यांची मल्हार, चंद्रकांत लोकरेंची एकदंत, विजय केंकरेंची प्रवेश, मिहीर गवळींची रॉयल थिएटर, निनाद कर्पेंची बदाम राजा प्रॉडक्शन, अजय कासुर्डेंची सरगम क्रिएशन, नंदू कदम यांची सोनल प्रॉडक्शन या निर्मिती संस्थांची नाटके झालेली नाहीत. पुढील किमान तीन महिने तरी या संस्था शिवाजी मंदिरमध्ये प्रयोग सादर करण्याची चिन्हे नाहीत. नाराज निर्मात्यांना चर्चेसाठी बोलावण्यात आल्याचे श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष मेजर सुधीर सावंत यांनी वारंवार सांगितले, पण शिवाजी मंदिर नाट्यगृहाच्या कारभारावर नाराज असलेल्या निर्मात्यांपैकी एक असलेल्या दिलीप जाधव यांनी याबाबत स्पष्ट नकार दिला.

'लोकमत'शी बोलताना दिलीप जाधव म्हणाले की, आम्हाला कोणीही चर्चेसाठी बोलावलेले नाही. शिवाजी मंदिरमध्ये प्रयोग न झाल्याने आमच्या नाटकांचे प्रयोग मुळीच थांबलेले नाहीत. तिथल्या असुविधांचा त्रास केवळ निर्मात्यांनाच होत नसून प्रेक्षकांनाही सहन करावा लागत आहे. पार्किंगच्या असुविधेसोबतच लिफ्टची सोय नाही. 'वाडा चिरेबंदी' आणि 'आज्जीबाई जोरात' या नाटकांचे सेट्सही तिथे लावता येत नाहीत. असे असूनही ५०० रुपये तिकिट दर केल्यास नाट्यगृहाचे भाडे वाढवले जाते. यापेक्षा त्यांच्या अटींवर आम्हाला तिथे प्रयोगच करायचे नाहीत. त्यामुळे यापुढेही शिवाजीमध्ये तारखाा घेणार नाही. आता यशवंत नाट्यमंदिर सुरू झाल्याने दादर-माटुंग्यातील प्रेक्षकांना तिथे आमची नाटके पाहता येतील. सगळीच नाटके चालत नसल्याचा नाट्यगृह व्यवस्थापनाने विचार करायला हवा. विनय आपटे प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या एकांकिका महोत्सवासाठीही पूर्ण भाडे आकारण्यात आल्याचेही जाधव म्हणाले. येऊन चर्चा करण्याचे आवाहन निर्मात्यांना केले, पण कोणी आले नाही. नाटकांच्या तारखा परस्पर विकू नका, तारीख बदलायची किंवा विकायची असल्यास नाट्यगृहाकडे सुपूर्द करा हेच आमचे म्हणणे आहे. नवीन निर्मात्यांना संधी द्यायला हवी. ५०० रुपये तिकिट दर केल्यास दुप्पट घेण्यात येणारे भाडे आम्ही दीडपट केले. त्यांनी ते मान्यही केले, पण नंतर माघार घेतली. काही नाटकांचे प्रयोग न झाल्याने नाट्यगृहाचे काहीही नुकसान झालेले नाही. - बजरंग चव्हाण, कार्यकारी विश्वस्त श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ ट्रस्ट

टॅग्स :नाटक