पुण्याच्या शिवाजी नगर आणि मुंबईतील ठाणे स्टेशनचा होणार कायापालट
By Admin | Published: June 22, 2017 04:02 PM2017-06-22T16:02:59+5:302017-06-22T16:02:59+5:30
पुण्याच्या शिवाजी नगर आणि मुंबईतील ठाणे स्टेशनचा कायापालट होणार आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22- प्रवासासाठी उत्तम आणि खिशाला परवडणारा प्रवास म्हणून रेल्वेच्या प्रवासाकडे बघितलं जातं. पण अनेकदा रेल्वे स्टेशनवरील गर्दी आणि तिथे असलेली अस्वच्छता या कारणांमुळे रेल्वेतून प्रवास नकोसा पण वाटतो. पण लवकरच अलिशान रेल्वे स्टेशनवरून प्रवास करण्याचं प्रवाश्यांचं स्वप्न साकार होणार आहे. यासाठीची पाऊलं उचलायला रेल्वे प्रशासनाने सुरूवात केली आहे. भारतातील एकुण 23 रेल्वे स्टेशन सार्वजनिक आणि खाजगी सहकार्यातून विकसित केली जाणार आहेत. विशेष म्हणजे पुण्यातील शिवाजी नगर रेल्वे स्टेशन आणि मुंबईतील ठाणे रेल्वे स्टेशनचा या 23 स्टेशन्समध्ये क्रमांक लागतो. एकदंरीतच शिवाजीनगर आणि ठाणे स्टेशनवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एअरपोर्टवर जशा सुविधा मिळतात तशाच सुविधा दिल्या जाणार आहेत.
ठाणे आणि शिवाजी नगर व्यतिरिक्त आनंदविहार, चंदिगड, गुजरातमधील गांधीनगर, हावरा, चेन्नई यांचा क्रमांक लागणार आहे. तसंच मुंबईतील मुंबई सेंट्रल, वांद्रे, बोरिवली, लोकमान्य टिळक या स्टेशनचा या यादीत सहभाग आहे. मध्य रेल्वे मार्गावरच ठाणे स्टेशन हे सगळ्यात गर्दीचं स्टेशन म्हणून ओळखलं जातं. याच ऐतिहासिक ख्याती असणाऱ्या ठाणे रेल्वे स्थानकाचा लवकरच कायापालट होणार आहे. यासाठी २०० कोटींची निविदा काढण्यात येणार आहे.
देशातील पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ साली बोरीबंदर ते ठाणे मार्गावर धावली होती. ठाणे स्थानकातून तब्बल ७ ते ८ लाख प्रवाशी प्रवास करतात. मात्र, स्थानकाला ऐतिहासिक वारसा असूनही अद्याप पुरेशा सोयीसुविधा नसल्याची ओरड प्रवाशांकडून ऐकु येते. आता खाजगीकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी ठाण्यातील नागरिकांना आद्ययवत सोई-सुविधा मिळणार आहेत. प्रत्यक्ष सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात होण्यासाठी ठाणेकरांना आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे.
देशातील एकूण २३ रेल्वे स्थानकांचा मेकओव्हर करण्याचे रेल्वे मंत्रालयाने ठरवलं आहे. यामध्ये भोपाळमधील हबीबगंज हे देशातील सार्वजनिक आणि खाजगी सहकार्यातून विकसित होणारं पहिलं रेल्वे स्टेशन आहे. हबीबगंज स्टेशच्या विकासाचे अधिकार बन्सल ग्रुपला दिले गेले आहेत. या करारानुसार बन्सल ग्रुपकडे आठ वर्षांसाठी हबीबगंजचे अधिकार राहतील. त्यात त्यांनी स्टेशनचं बांधकाम, देखभाल या गोष्टींकडे लक्ष देणं अपेक्षित आहे. कंपनीला स्टेशनच्या मालकीची जमीन ४५ वर्षांच्या लीजने दिली जात असून तिथे जागतिक स्तरावरचे शॉपिंग प्लाझा, रेस्टॉरंटस, खाद्यपदार्थाची दुकानं, पार्किंग सुविधा असणार आहे.
या स्टेशनसाठी सौर ऊर्जेचा वापर केला जाणार असून दिव्यांगांसाठी विशेष सुविधा असतील. यामध्ये बन्सल ग्रुपकडून 400 कोटी रुपये गुंतविले जाणार आहेत. त्यापैकी 100 कोटी रूपये स्टेशनच्या पुर्नविकासावर खर्च केले जाणार आहेत तर बाकी रक्कम इतर सोयी-सुविधा देण्यावर खर्च होतील. आणिबाणिच्या काळात चार मिनिटात सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढता येईल, अशा पद्धतीने हे स्टेशन विकसित केलं जाणार आहे.