शिवाजी पार्क परिसराला पार्किंगच्या नियमात सवलत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 11:45 PM2020-03-04T23:45:53+5:302020-03-04T23:45:59+5:30
स्थानिक नागरिकांच्या तीव्र विरोधामुळे अखेर महापालिकेने दादर पश्चिम येथील शिवाजी पार्क परिसराला पार्किंगच्या दंडातून वगळले आहे.
मुंबई : स्थानिक नागरिकांच्या तीव्र विरोधामुळे अखेर महापालिकेने दादर पश्चिम येथील शिवाजी पार्क परिसराला पार्किंगच्या दंडातून वगळले आहे. या परिसरात बहुतांशी जुन्या इमारतींमध्ये वाहनतळाची सोय नसल्याने रहिवासी इमारतीबाहेर रस्त्यावर वाहन उभे करतात. मात्र विधानसभा निवडणुकीच्या काळात पालिकेने पार्किंगवर बंधने आणल्यानंतर स्थानिक तसेच राजकीय स्तरातून विरोध होऊ लागला. अखेर या दबावामुळे प्रशासनाने या परिसराला नवीन नियमातून सूट दिली आहे.
मुंबईतील पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी पालिकेने सार्वजनिक वाहनतळाच्या पाचशे मीटर परिसरात वाहन उभे करणाऱ्यावर कारवाई सुरू केली. या कारवाईअंतर्गत दादर परिसरातही इमारतीबाहेर वाहन उभे करणाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली. मात्र या परिसरात अनेक इमारती जुन्या असल्याने तिथे पार्किंगची सोय नाही. त्यामुळे पालिकेच्या या कारवाईला तीव्र विरोध होऊ लागला. विधानसभा निवडणुकीच्या काळातच हा नियम लागू झाल्यामुळे राजकीय पक्षांनी हा विषय उचलून धरला. दादर परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने नागरिकांनी स्थानिक नेत्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. मनसेनेही हा मुद्दा चांगलाच पेटवला होता.
निवडणुकीच्या काळात पार्किंगचा वाद पेटल्यानंतर पालिकेने कारवाई सुरू ठेवली होती. मात्र कोहिनूर सार्वजनिक वाहनतळाच्या परिसरात लावलेले पार्किंगच्या दंडाचे फलक काढण्यात आले. त्यामुळे हळूहळू नागरिकांनी पुन्हा आपल्या इमारतीबाहेर आपले वाहन उभे करण्यास सुरुवात केली. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार कोहिनूर वाहनतळाच्या एका बाजूला जागा असल्याने तिथे पार्किंगची परवानगी आता दिली जाणार आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे शिवाजी पार्क परिसरातील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.