शिवाजी पार्क होणार धूळमुक्त; अन्य खेळांनाही प्रोत्साहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:05 AM2021-01-14T04:05:37+5:302021-01-14T04:05:37+5:30
मुंबई - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरप्रमाणे शेकडो खेळाडूंना घडविणाऱ्या दादर पश्चिम येथील शिवाजी पार्कचा महापालिका कायापालट करणार आहे. या ...
मुंबई - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरप्रमाणे शेकडो खेळाडूंना घडविणाऱ्या दादर पश्चिम येथील शिवाजी पार्कचा महापालिका कायापालट करणार आहे. या मैदानावर आता केवळ क्रिकेट नव्हे तर जॉगिंग, सायकल ट्रॅक, फुटबॉल, स्केटिंग अशा खेळांना प्रोत्साहन देणाऱ्या सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. तसेच येथील धुळीचा त्रास दूर करण्यासाठी मैदानात गवत लावण्यात येणार असून पावसाळ्यात पाण्याचा निचरा जलद होण्याकरिता स्वतंत्र पर्जन्य वहिनीची व्यवस्था करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सहा कोटी रुपये मंजूर केले आहेत.
शिवाजी पार्कवर राजकीय सभा, विविध खेळ, सार्वजनिक कार्यक्रम होत असतात. ज्येष्ठ नागरिक येथे फेरफटका मारण्यासाठी नियमित येतात. मात्र, या मैदानावरील धुळीचा त्रास होत असल्याची तक्रार नागरिक पालिकेकडे अनेकवेळा करीत आहेत. हा त्रास टाळण्यासाठी मनसेने येथे पाण्याचा शिडकावा करणारे यंत्र बसवले; परंतु पुरेशा पाण्याअभावी त्याचा फारसा परिणाम झाला नाही. धुळीच्या तक्रारीव्यतिरिक्त सार्वजनिक शौचालयाची कमतरता आदी समस्या स्थानिकांनी मांडल्या होत्या.
विविध खेळांना मिळणार प्रोत्साहन...
९८ हजार २४३ चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या शिवाजी पार्कवर क्रिकेटसाठी आठ खेळपट्ट्या आहेत. नवीन आराखड्यानुसार अन्य खेळांसाठीही जागा उपलब्ध होणार आहे. फुटबॉलसाठी उच्च दर्जाचे मैदान तयार करण्यात येणार आहे. या मैदानातील उर्वरित ३१ टक्के जागा खुली ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे त्या जागेत सामाजिक व राजकीय मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन सहज होऊ शकेल. यामध्ये दोन लाख लोक बसतील, एवढी जागा उपलब्ध असणार आहे.
मैदानावर होणार पाण्याचा शिडकावा...
शिवाजी पार्कमध्ये धूळ अधिक असल्याने त्यावर वेळोवेळी पाण्याचा शिडकावा करण्यासाठी महापालिका या ठिकाणी स्प्रिंगलर बसविणार आहे. पहिल्या टप्प्यात मैदानात पर्जन्य वाहिन्यांची व्यवस्था, रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवस्था आणि गवत लावण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात विविध खेळांसाठी मैदान तयार करण्यात येणार आहे.