मुंबईतील शिवाजी पार्कची देखभाल तीन कोटीत, 3 वर्षांसाठी नेमणार ठेकेदार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 12:02 PM2022-03-27T12:02:28+5:302022-03-27T12:02:54+5:30
शेकडो खेळाडूंना घडविणाऱ्या शिवाजी पार्कचा महापालिका कायापालट करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवाजी पार्कच्या देखभालीसाठी पहिल्यांदाच ठेकेदार नेमला जाणार आहे. गेल्या वर्षी या मैदानाला धूळमुक्त करण्यासाठी महापालिकेने प्रकल्प हाती घेतला होता. आता पुढील तीन वर्षांसाठी या मैदानाची दुरुस्ती व देखभालीसाठी तीन कोटींचे कंत्राट दिले जाणार आहे. यासाठी पालिका प्रशासनाने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
शेकडो खेळाडूंना घडविणाऱ्या शिवाजी पार्कचा महापालिका कायापालट करीत आहे. या मैदानावर केवळ क्रिकेट नव्हे तर जॉगिंग, सायकल ट्रॅक, फुटबॉल, स्केटिंग अशा खेळांना प्रोत्साहन देणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मात्र, येथील धुळीने स्थानिक रहिवासी त्रस्त आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. यासाठी विहिरी, रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून रिचार्ज करत हे मैदान धूळमुक्त करण्यात येत आहे. गवताची निगा राखणे व मैदानाच्या देखभालीसाठी ठेकेदाराची नियुक्ती केली जाणार आहे.
पहिल्यांदाच नेमणार ठेकेदार...
उद्यान, मैदानांच्या दैनंदिन देखभालीसाठी ठेकेदारांची नेमणूक केली जात होती. शिवाजी पार्कच्या देखभालीसाठी कधीही ठेकेदार नियुक्त न करता क्लबच्या माध्यमातून त्या परिसराची देखभाल केली जात असे. आता या मैदानावर हरित पट्टा निर्माण केल्याने त्यांची निगा राखण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी निविदा मागवली आहे. यामध्ये १२ माळी आणि १२ सफाई कामगारांचा समावेश असणार आहे.
मैदानाचे क्षेत्रफळ : एक लाख चौरस मीटर
क्रिकेटच्या खेळपट्टी : २५ टक्के
फुटबॉल खेळपट्टी : ५ टक्के
जॉगिंग आणि सायकल ट्रॅक : ६ %
इतर नवीन खेळ : ३ %
उर्वरित खेळाची मोकळी जागा : ३१%
एकूण ८ क्रिकेटच्या खेळपट्ट्या : १५०० चौरस मीटर
अशी राखणार मैदानाची निगा
मैदानाला पाणी मारणे, पंप सुरू करणे तसेच मैदान परिसराची स्वच्छता राखणे.
विविध कार्यक्रम व सभांच्या आयोजनानंतर तेथे स्वच्छता राखण्याची जबाबदारी संबंधित संस्थेवर असेल. महिन्याला आठ लाख रुपये तर वार्षिक एक कोटींचा खर्च अपेक्षित आहे.