Join us

शिवाजी मंदिरचा पन्नाशीत प्रवेश

By admin | Published: May 01, 2015 1:21 AM

नाट्यक्षेत्रातील रसिक - कलावंतांशी अतूट नाते निर्माण करणारे शिवाजी मंदिर यावर्षी ५०व्या वर्षात पदार्पण करत आहे.

मुंबई : नाट्यक्षेत्रातील रसिक - कलावंतांशी अतूट नाते निर्माण करणारे शिवाजी मंदिर यावर्षी ५०व्या वर्षात पदार्पण करत आहे. ३१ डिसेंबर १९४३ रोजी स्थापन झालेल्या ‘श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ’ (ट्रस्ट) ने या बंदिस्त नाट्यगृहाची निर्मिती केली. मुंबई शहरात सांस्कृतिक संस्था असावी, जिच्या माध्यमातून कलेचा विस्तार होईल असा व्यापक दृष्टीकोन घेऊन ३ मे १९६५ रोजी शिवाजी मंदिर नाट्यगृहाची स्थापना झाली होती.याविषयी, मंडळाचे अध्यक्ष शशिकांत भालेकर म्हणाले की,या वास्तूच्या स्थापनेत महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांचे मोलाचे सहकार्य लाभले गोवा राज्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दर्शनी भागात श्री शिवछत्रपतींचा भव्य पुतळा असलेले नाटक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सर्व सुखसोयींनी परिपूर्ण असे प्रेक्षागृह उभारण्याचा संकल्प मंडळाच्या स्थापनेवेळी सोडण्यात आला होता, ही वास्तू म्हणजे त्याचेच मूर्त स्वरूप आहे.शिवाजी मंदिरमध्ये नाटक, नृत्य, गीत, संगीताचा कार्यक्रम हमखास रंगतो असे आवर्जून सांगणारे अनेक रसिक आहेत. नटवर्य नानासाहेब फाटक, नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर, गणपतराव बोडस, मा.दत्ताराम, डॉ काशिनाथ घाणेकर, डॉ. श्रीराम लागू, विमल कर्नाटक, मीनाक्षी शिरोडकर,आशा काळे यांच्यापासून विक्रम गोखले, मोहन जोशी, प्रशांत दामले, भरत जाधवपर्यंत सर्वांचेच शिवाजी मंदिर श्रद्धास्थान आहे. येथील रंगमंचावर प्रवेश केला की वेगळेच स्फुरण चढते, असे उद्गार यासर्व प्रसिद्ध कलाकारांनी नेहमीच काढलेले आहेत. (प्रतिनिधी)शिवाजी मंदिर नाट्यगृहाच्या ५० व्या वर्धापनदिनाचा ७ मे रोजी दुपारी ४ वाजता होणाऱ्या सोहळ्यात माजी कृषी मंत्री (भारत सरकार) शरद पवार अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा मंत्री विनोद तावडे तसेच राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित राहाणार आहे.