शिवरायांना मानवंदना देणारे ४० महिलांचे 'शिवप्रताप'

By संजय घावरे | Published: May 31, 2024 08:10 PM2024-05-31T20:10:46+5:302024-05-31T20:11:58+5:30

श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात रंगला प्रयोग; महिला कलाकारच साकारतेय छत्रपतींची भूमिका

'Shivapratap' of 40 women paying homage to Shivaji maharaj | शिवरायांना मानवंदना देणारे ४० महिलांचे 'शिवप्रताप'

शिवरायांना मानवंदना देणारे ४० महिलांचे 'शिवप्रताप'

मुंबई - ४० महिलांनी ४५ व्यक्तिरेखा साकारलेले 'शिवप्रताप' हे ऐतिहासिक नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आले आहे. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना ४० स्त्रियांनी मुंबईपासून मालवणपर्यंत या नाटकाचे प्रयोग सादर केले आहेत. नुकताच श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात सादर झालेल्या प्रयोगाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

विनया असोसिएसने सादर केलेल्या 'शिवप्रताप' या दोन अंकी नाटकाची निर्मिती प्रवीण राणे यांनी केली आहे. लेखन श्रुती परब यांनी केलं असून, त्यांनीच निलिमा खोत यांच्या साथीने दिग्दर्शनही केले आहे. स्वयंसिद्धी महिला मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्याच्या हेतूने सर्वप्रथम हे नाटक हौशी रंगभूमीवर सादर करण्यात आले होते. प्रवीण राणे यांच्या पाठबळामुळे हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आले आहे. वर्किंग वूमन, उद्योजिका आणि गृहिणी अशा सर्व स्तरांतील ४० महिलांनी मिळून 'शिवप्रताप' हे नाटक बसवले असून, यातील ४५ व्यक्तिरेखा या महिलाच साकारत आहेत. यातील शिवरायांच्या भूमिकेतही महिलाच असून, अफझलखानही एका स्त्रीनेच साकारला आहे. भारतीय रंगभूमीवर अशा प्रकारचा अनोखा प्रयोग प्रथमच सादर केला जात आहे. नुकताच या नाटकाचा प्रयोग श्री शिवाजी मंदिर नाट्यग्हात सादर करण्यात आला. या प्रयोगाला कला क्षेत्रातील मान्यवरांनीही हजेरी लावली होती. 

'शिवप्रताप'च्या प्रवासाबाबत लेखिका-दिग्दर्शिका श्रुती परब 'लोकमत'शी बोलताना म्हणाल्या की, आमच्या मंडळातर्फे दरवर्षी शिवजयंतीला महाराजांना मानवंदना देण्यासाठी पोवाडा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, एकांकिका स्पर्धांचे आयोजन केले जाते. मागच्या वर्षी महाराजांना मानवंदना देण्यासाठी दोन अंकी नाटक बसवायचे ठरले. १९ फेब्रुवारीला नाट्यगृह न मिळाल्याने १८ मार्चला तिथीनुसार शिवजयंतीला हौशी रंगभूमीवर नाटक सादर केले. प्रवीण राणे यांनी तालीम आणि मेहनत पाहिल्यावर हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणण्यासाठी पुढाकार घेतला. यासाठी त्यांनी आम्हाला तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठीचे प्रशिक्षण घ्यायला सांगितले. २० दिवसांच्या प्रशिक्षणाचा खर्च त्यांनीच केला. संकल्पना मनात आल्यापासून नाटक रंगभूमीवर येईपर्यंत नऊ महिने लागले. त्यामुळे आम्ही ४० महिलांनी नऊ महिन्यांमध्ये 'शिवप्रताप' या नाट्यरूपी बाळाला जन्म दिला आहे. परळ, दादर, वाशी, ठाणे, कल्याण, कोल्हापूर, मालवण असे विविध ठिकाणी याचे प्रयोग झाले आहेत. 

छत्रपतींच्या भूमिकेत निलीमा खोत
सर्वसामान्य महिलांच्या या नाटकातया नाटकात कोणीही दिग्गज कलाकार नाही. शिवरायांच्या भूमिकेत निलीमा खोत असून, दिया पराडकर अफझलखान साकारत आहेत. श्वेता सावंतने कृष्णाजी भास्कर साकारले असून, बडी बेगम आणि गोपीनाथपंत कुलकर्णी या दुहेरी भूमिका श्रुती परब, तर बहिर्जी नाईकांच्या भूमिकेत प्रतिमा राणे आहेत. कान्होजी जेधे‌ आणि जीवा महालांच्या भूमिकेत वनिता पवार, तर राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत आरती राजाध्यक्ष आहेत. इतर व्यक्तिरेखा अर्णवी साईंम, रोहिणी वाईरकर, दिशा आंगणे, ऐश्वर्या भुरके, सुवर्णा नकाशे, प्रणिता साटम, भैरवी बागकर, सिद्धी बने, शीतल बने, सुरेखा गव्हाणे, मनीषा शिंदे, स्वाती पेडणेकर, अमिता पवार, स्नेहा मोहिते, अश्विनी परब, पायल शेगडे, सुरभी शेगडे, तीर्था जाधव, सुशांत सावंत आदी साकारत आहेत.

Web Title: 'Shivapratap' of 40 women paying homage to Shivaji maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.