Join us

तीन वर्षांसाठी महाराष्ट्रात येणार शिवरायांची वाघनखे; सांस्कृतिक कार्यमंत्री लंडन दौऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2023 7:28 AM

ती वाघनखे नक्की शिवरायांचीच?

मुंबई :  व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमच्या वेबसाइटवर ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरली नाहीत, अशी माहिती दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आणली जाणारी वाघनखे खरोखरच शिवरायांची आहेत का, असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी विचारला.

यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त १६५९ मध्ये शिवरायांनी अफझल खानाचा कोथळा ज्या वाघनखांनी काढला, ती वाघनखे ३ वर्षांसाठी महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. याविषयीचा महत्त्वपूर्ण करार करण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे उद्या रविवारी लंडनला रवाना होणार आहेत. ३ ऑक्टोबर रोजी इंग्लडच्या व्हिक्टोरिया ॲण्ड अल्बर्ट म्युझियमसोबत याविषयी करार केला जाणार आहे.

वाघ देऊ, वाघनखे कायमस्वरूपी द्या!

छत्रपती शिवरायांची वाघनखे महाराष्ट्रात कायमस्वरूपी आणण्यासाठी आम्ही ब्रिटन सरकारला प्रस्ताव दिला आहे.

पहिल्यांदा ते एक वर्षासाठी म्हणाले होते आता ते तीन वर्षांसाठी देत आहेत. आपला प्रयत्न असा आहे की ती वाघनखे कायमस्वरुपी इथे यावीत, त्या बदल्यात वाघाची एक जोडी देऊ. छत्रपती शिवरायांची जगदंबा तलवारही आणण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.